Jui Gadkari Demanded Shuttle Service : मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी ही मनोरंजन क्षेत्रात काम करण्याबरोबरच त्यांचं सामाजिक भानही जपतात. यामुळेच ही कलाकार मंडळी चाहत्यांना आपलीशी वाटतात. मराठी मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे समाजाबद्दलच्या अनेक विषयांवर सोशल मीडियाद्वारे भाष्य करताना दिसतात. अशातच आता ‘ठरलं तर मग’ मालिकेमधील सायली अर्थात अभिनेत्री जुई गडकरीने फिल्मसिटीतील लोकांसाठी घरी जाण्याची सोय व्हावी यासाठी मागणी केली आहे.
जुईने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून तिने गोरेगाव इथल्या फिल्मसिटीमधील ज्युनिअर आर्टिस्ट आणि तंत्रज्ञ मंडळींना चित्रीकरण संपल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी शटल सेवा सुरू केली जावी अशी विनंती केली आहे. ही विनंती करणारा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसह जुईने “ही सुविधा मिळाली तर सगळ्यांनाच सुरक्षितपणे बाहेर पडता येईल” असं म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये जुईने असं म्हटलं आहे की, “आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडीओ बनवत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. मला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे आणि तो विषय म्हणजे मी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव इथे चित्रीकरण करत होते. गेले दोन दिवस पावसाने जो काही धुमाकूळ घातला तो सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आमचं चित्रीकरणही थांबलं होतं. पण त्यानंतर आमचं पॅकअप झालं आणि मी बऱ्याच ज्युनिअर आर्टिस्ट आणि तंत्रज्ञ मंडळींना चालत जाताना पाहिलं.”
यापुढे जुई म्हणाली, “यावेळी माझ्या गाडीने मी युनिटच्या चार मुलींना सोडलं. प्रत्येक जण हात दाखवत गाडी थांबवत होता. आम्हाला बाहेरपर्यंत सोडा असं त्यांचं म्हणणं होतं. अशी बरीच माणसं असतात, जी चालत मुख्य प्रवेशापर्यंत जातात. तर यानिमित्ताने मला फिल्मसिटीच्या आणि प्रशासनाच्या माणसांना ही विनंती करायची आहे की, तुम्ही एखादी शटल सुविधा सुरू करु शकाल. असं काही होऊ शकतं का? जी शटल सेवा शूटिंगनंतरच्या पॅकअपच्या वेळेस त्यांना मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सोडू शकेल.”
यानंतर जुईने असं म्हटलं की, “बाहेर जाण्यासाठी कुणाकडे स्वत:च वाहन असतंच असं नाही. काही जण असेही असतात की, त्यांना रोज बाहेर सोडण्यासाठी कोणाला ना कोणाला विचारणे जड जाते. तर त्यांच्यासाठी शटल सुविधा असावी, जी थोड्या थोड्या वेळाने फिल्मसिटीमध्ये फिरेल आणि लोकांना बाहेर बसेस मिळतात तिथपर्यंत सोडेल. जमल्यास या गोष्टींचा प्रयत्न करा. अशी खूप मंडळी आहेत, ज्यात मुलं आणि मुलीही आहेत. अर्थात इथे मुलं किंवा मुली हा प्रश्न नसून सर्वांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.”
यापुढे जुईने म्हटलं, “फिल्म्ससिटीमध्ये रिक्षा किंवा टॅक्सी येत नाही. त्यामुळे पॅकअपनंतर खूप समस्या होतात. तर कृपया या शटल सेवेसाठी मी फिल्मसिटी आणि महाराष्ट्र सरकारमधील अधिकाऱ्यांना विनंती करते. शिवाय जे कोणी कलाकारदेखील हा व्हिडीओ पाहत असतील आणि तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर कृपया हा व्हिडीओ शेअर करा. जेणेकरून तुम्हालासुद्धा कधीतरी तुमची स्वत:ची गाडी नसल्यास या शटल सेवेचा फायदा होईल.”
दरम्यान, जुईने गडकरीने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्युनिअर आर्टिस्ट आणि तंत्रज्ञ मंडळींच्या घरी जाण्याच्या सोयीचा हा विचार केल्याबद्दल अनेकजण जुईचं कौतुक करत आहेत. “या गोष्टीची खरंच गरज आहे”, “आमचा विचार केल्याबद्दल धन्यवाद”, “तुमच्यासारखा विचार प्रत्येक कलाकाराने करावा” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी अभिनेत्रीचं भरभरून कौतुक केलं आहे.