मराठी कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे हे कलाकार त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच अनेकदा हे कलाकार त्यांच्या कामानिमित्तची माहितीही सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. शिवाय काही कलाकार हे बऱ्याचदा राजकीय आणि सामाजिक विषयांवरही त्यांच्या सोशल मीडियाद्वारे भाष्य करताना दिसतात. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री ज्योत्सना पाटील आणि अंकिता पनवेलकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चॉकलेट संदर्भातील आहे. ज्योत्सना व अंकिता या अभिनेत्रींनी चॉकलेट विकत घेतलं. या चॉकलेटमध्ये त्यांना चक्क अळ्या असल्याचे आढळलं. शिवाय या चॉकलेटला बुरशीही आल्याचे त्यांनी सांगितलं आहे. ज्योत्सना पाटील आणि अंकिता पनवेलकर यांनी याबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी असं म्हटलं, “आम्ही आता साताऱ्याच्या डी-मार्टमध्ये आहोत आणि आम्हाला कोणत्या कंपनी किंवा डी-मार्टची बदनामी करण्याचा उद्देश नाही. पण आम्ही नुकतंच चॉकलेट घेतलं आहे. ज्यात अळ्या आणि बुरशी आल्याचे दिसत आहे. नशिबाने आम्ही दिवसा हे घेतलं आणि ती उघडल्या उघडल्या आम्हाला त्यात अळ्या आणि बुरशी आल्याचे दिसलं. हे खूपच भयानक आहे, जर हे एखाद्या लहान मुलाच्या हातात असतं आणि त्याने हे खाल्लं असतं तर?”
यापुढे त्यांनी असं म्हटलं, “कधीतरी आपली इच्छा होते आणि आपण चॉकलेट घेतो आणि खातो. तेच आम्ही केलं असतं तर हे थेट पोटात गेलं असतं. आमचा कुणालाही बदनाम करण्याचा उद्देश नाही. पण हे चॉकलेट ज्या कंपनीचं आहे, त्यांनी कृपया याची काळजी घ्या की, आपल्याकडून अशा पद्धतीच्या गोष्टी लोकांपर्यंत जात आहेत. त्यात चॉकलेट ही अशी गोष्ट आहे की, लहान मुलं ही वस्तु खूप खातात. त्यामुळे कुणालाच इतकं हलक्यात घेऊ नका.”
याशिवाय त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “डी-मार्टमधून खरेदी केलेल्या चॉकलेटमध्ये अळी आढळणे हे धक्कादायक आहे. अन्न सुरक्षेबद्दलची ही गंभीर चिंताजनक बाब आहे. कृपया असे पदार्थ सेवन करण्यापूर्वी तपासून घ्या” असं म्हणत चाहत्यांना पदार्थ घेताना सावध राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनीही या संपूर्ण प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. तसंच अनेकांनी याबद्दल तक्रार करण्यासही सांगितलं आहे.