Zee Marathi Kamali Serial Promo : महाजन कुटुंबीयांची संपूर्ण प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर व्हावी यासाठी कामिनीने आजवर अनेक कटकारस्थानं केली आहेत. याच कारस्थानाचा एक भाग म्हणून कामिनीने काही वर्षांपूर्वी राजनची पहिली पत्नी गौरी आणि तिची चिमुकली लेक कमळीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. या घटनेमुळे गौरी आणि कमळी सर्वांपासून दूर गावात जाऊन राहतात. मात्र, कधी ना कधी माझी मोठी नात नक्की या घरी परत येईल असा विश्वास अन्नपूर्णाला असतो.

जर अन्नपूर्णाची मोठी नात पुढच्या सहा महिन्यात पुन्हा घरी आली नाही तर, महाजन कुटुंबीयांची सगळी पॉपर्टी अनिकाच्या नावावर करायची असं वचन कामिनीने अन्नपूर्णाकडून घेतलेलं असतं. नाईलाज म्हणून अन्नपूर्णाला सुद्धा कामिनीचा हा प्रस्ताव मान्य करावा लागतो. मात्र, काही करून मी माझ्या मोठ्या नातीला पुढच्या ६ महिन्यांत शोधून काढेन असं अन्नपूर्णा ठामपणे सर्वांना सांगते.

राजन सुद्धा आपल्या पहिल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी कोल्हापुरात जातो. कामिनी यावेळी गुंडांसह तिथे आलेली असते. गौरी आणि तिची लेक दिसताच क्षणी दोघींना संपवून टाका असे आदेश कामिनीने गुंडांना दिलेले असतात. मात्र, महाजनांची मोठी नात दुसरी-तिसरी कोणीही नसून कमळीच आहे हे सत्य आजोबा सोडल्यास अद्याप कोणालाच माहिती नाहीये.

अशातच आता गुरुजी अन्नपूर्णा आजींसमोर त्यांच्या मोठ्या नातीविषयी एक भाकीत करणार आहेत. आज दुपारपर्यंत तुमची मोठी नात तुमच्या घरी येईल असा योग असल्याचं ते आजीला सांगतात. यामुळे अन्नपूर्णा प्रचंड आनंदी होते. ती लाडक्या मोठ्या नातीच्या वाटेकडे डोळे लावून बसते. पण, हे सगळं कामिनी गुपचूप ऐकते आणि अन्नपूर्णाने मोठ्या नातीसाठी बनवलेल्या जेवणात विष मिसळण्यास एका कामगाराला सांगते.

आता आजींची मोठी नात खरंच घरी येणार का? अन्नपूर्णाची मोठी नात कमळीच आहे. त्यामुळे कमळी घरी आल्यावर अन्नपूर्णा तिला ओळखेल का? सर्वाच महत्त्वाचं म्हणजे, कामिनीने विषप्रयोग केलेली खीर खाऊन कोणाची प्रकृती बिघडणार, कमळीची खरी ओळख तिला केव्हा समजणार हे सगळं मालिकेच्या १० ऑक्टोबरच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.