Khushboo Tawade Kolhapur Home : खुशबू तावडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर हिंदी मराठी दोन्ही भाषेत विविध माध्यमांत काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा यामार्फत ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते.

खुशबूचे स्वत:चे यूट्यूब चॅनेलही आहे, ज्यामार्फत ती अनेकदा व्लॉग करत असते. अशातच अभिनेत्रीने नुकताच नवीन व्हिडीओ तिच्या चॅनेलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ विशेष आहे, कारण अभिनेत्रीने यामधून पहिल्यांदाच तिच्या सासरची म्हणजेच कोल्हापुरातील घराची झलक दाखवली आहे.

खुशबूने या व्हिडीओतून तिचा नवरा म्हणजेच अभिनेता संग्राम साळवीच्या कोल्हापुरातील घराची झलक दाखवली आहे. यावेळी ती सहकुटुंब कोल्हापुरात गेली असून ती तिच्या सासरी रमल्याचं तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधून दिसतं.

‘असं’ आहे खुशबूचं सासर

खुशबूने या व्हिडीओमधून तिच्या सासरच्या घरातील म्हशींचा गोठा दाखवला आहे. यासह त्यांच्या घरात संग्रामचा मोठा फोटो असल्याचं दिसतं. खुशबूनं सकाळच्या नाश्त्याला खास कोल्हापुरी मिसळवर ताव मारल्याचं दिसतं. यावेळी तिने तिच्या सासरी असलेल्या अंबाबाईच्या देवळाचीही झलक दाखवली. यासह तिने कोल्हापुरातील बाळूमामाच्या मंदिराचीही झलक दाखवली असून ती तिथे तिच्या कुटुंबीयांसह दर्शनाला गेल्याचं तिने यातून म्हटलं आहे.

खुशबू व संग्राम मंदिरात गेलेले असताना तिथे त्यांच्या गावातील अनेक जण त्यांच्याबरोबर फोटो काढताना तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. खुशबू, संग्राम व तिची दोन मुलं राघव आणि राधी यांच्याबरोबर सासरी गेल्याचं या व्हिडीओमधून दिसतं.

खुशबू अनेकदा सोशल मीडियामार्फत व तिच्या व्लॉगमार्फत तिच्या आयुष्यातील घडामोडी, घरातील कार्यक्रम याबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. दरम्यान, खुशबू तावडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ‘झी मराठी’वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून झळकलेली. यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारलेली. यानंतर ती अद्याप कोणत्याही नवीन मालिकेतून किंवा इतर प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही, त्यामुळे आता ती कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरेल.