Kunickaa Sadanand Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’मधील स्पर्धक, अभिनेत्री कुनिका सदानंद तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती बिग बॉसच्या घरात तिचे वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, अफेअर्स, संघर्ष आणि नाती या सर्व गोष्टींबद्दल उघडपणे बोलत असते. आता ताज्या एपिसोडमध्ये तिने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी सांगितल्या. तसेच एकेकाळी दारूचं व्यवसन होतं असा खुलासाही तिने केला.

प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि मृदुल तिवारी यांच्याशी बोलताना कुनिका सदानंदने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. मृदुल तिवारीने कुनिका सदानंदनला तिच्या आयुष्यातील एक चांगली आणि एक वाईट सवय विचारली. कुनिका म्हणाली, “मी अजिबात ड्रग्ज घेत नाही, पण एक काळ असा होता जेव्हा मी खूप दारू प्यायचे. ब्रेकअपनंतर मी भावनिकरित्या खूप निराश झाले होते. माझं वजन खूप वाढलं होतं. एकदा डबिंग करताना मी स्वतःकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘अरे देवा, मी कशी दिसतेय?'”

दारू प्यायची कुनिका सदानंद

कुनिका पुढे म्हणाली, “जेव्हा मला सुट्टी असायची तेव्हा मी दुपारी बिअर प्यायचे. नाहीतर मला दारूचे आणखी जास्त व्यसन जडले असते. मी नाईटक्लबमध्ये जायचे आणि दारू प्यायचे. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, ‘दुसऱ्याच्या पैशांची दारू कधीच पिऊ नको.'”

कुनिकाने नंतर तिच्या डेटिंग लाइफबद्दल सांगितलं. “मी अनेक डिनर डेट्सवर गेले आहे. त्यापैकी काहींनी २०,००० रुपयांचे शॅम्पेन ऑर्डर केले होते. एक-दोन दिवसांनी डेटवर येणारे म्हणायचे, ‘हे बेस्ट शॅम्पेन आहे, ते खूप महाग आहे. मी त्यासाठी खूप पैसे दिले.’ हे सगळं ऐकल्यावर त्या व्यक्तीने मला पुन्हा डिनर डेटसाठी बोलावल्यावर ‘मी येणार नाही,’ असं स्पष्ट शब्दांत सांगितलं,” असं कुनिका म्हणाली.

कुनिका सदानंदची नाती

कुनिकाने त्या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला. मग गौरवने तिला किती रिलेशनशिपमध्ये होतीस? असा प्रश्न विचारला. त्यावर “माझे दोन लिव्ह-इन रिलेशनशिप आणि चार रोमान्स राहिले आहेत. आणि दोन लग्ने. म्हणजे, मी ६० वर्षांची होईपर्यंत, एवढी नाती… ठीक आहे,” असं उत्तर कुनिका सदानंदने दिलं.

दरम्यान, कुनिका सदानंद गायक कुमार सानूबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. कुमार सानू विवाहित असताना तिचं अफेअर होतं. दोघे सहा वर्षे नात्यात होते. नंतर कुमार सानूने फसवणूक केल्याने ब्रेकअप केल्याचं कुनिकाने म्हटलं होतं.