अभिनेता कुशल बद्रिके ‘चल हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. आज सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अर्थात मनोरंजन क्षेत्रातील त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. पण या सगळ्यात त्याला त्याची पत्नी सुनयनाची खंबीर साथ मिळाली आहे. आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रेम व्यक्त करत त्याने बायको सुनयनासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

कुशल बद्रिके सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो आणि याच माध्यमातून तो चाहत्यांशी संवादही साधताना दिसतो. अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होतात. आताही त्याने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. कुशलने या पोस्टबरोबर बायकोबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने त्याने बायकोवरील प्रेम कवितेच्या रुपात व्यक्त केलं आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

आणखी वाचा- “मला काही संजूबाबा…”, कुशल बद्रिकेची संजय दत्तबद्दल पोस्ट, निलेश साबळेंचा केला उल्लेख

कुशल बद्रिकेची पोस्ट-

“यार सुनयना….
एकदा ना, आपण दोघेच कुठेतरी लांब असे “डोंगरावर” जाऊ, म्हणजे “लडाख” वगैरे असं कुठेतरी,
डोंगराला कुशीत घेणार आभाळ एकमेकांच्या कुशीतून पाहू.
एकदा, “समुद्रकिनारी” राहायला जाऊ,
आयुष्यातल्या सुखाची भरती आणि ओहोटी तिथल्या लाटांवर मोजू.
एकदा दोघेच आपण असं “जंगलात” जाऊ, म्हणे तिथे नात्याला नवी पालवी फुटते!
आपण जाऊ आणि बहरूनच परत येऊ!
एकदा , “बर्फात” जायला हवं यार..
उबदार मिठीसाठी म्हणे परफेक्ट वातावरण असतं तिथे गार गार.
असे असंख्य “एकदा” राहून गेलेत तुझ्या माझ्या आयुष्यातले,
“एकदाचे” सगळे पूर्ण करून टाकू यार.
From the bottom of the heart I love you.
And happy Valentine day.”

आणखी वाचा- Dream Girl 2 Teaser: बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल २’चा टीझर प्रदर्शित, स्त्री वेशातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. अनेकदा तो पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. याशिवाय त्याच्या इतर इन्स्टाग्राम पोस्ट आणि व्हिडीओही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. कुशलने त्याच्या दमदार विनोदी स्टाइलने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.