Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 becomes the highest TRP winning Show : स्मृती इराणी व अमर उपाध्याय यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मालिका नुकतीच सुरू झाली. अशातच प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसतं. मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे.
‘क्योंकी सास भी कभी बहू थी २’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी अभिनेत्री रूपाली गांगुलीची मुख्य भूमिका असलेली ‘अनुपमा’ व दिलीप जोशी यांच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा हिंदी टेलिव्हिजन विश्वात बोलबाला असायचा. परंतु, आता स्मृती इराणी यांच्या मालिकेनं चक्क या दोन मालिकांना टीआरपीच्या शर्यतीत मागे टाकल्याचं पाहायला मिळतं.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ TRPच्या शर्यतीत अव्वल!
माध्यमांतून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने BARC DATA नुसार ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’चा टीआरपी २.५ इतका आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत हिंदी मालिकाविश्वात मालिकांच्या पदार्पणातील काळातील हा सर्वाधिक टीआरपी असल्याचंही म्हटलं जात आहे. पूर्वी ‘अनुपमा’ व ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांचे सर्वाधिक २.१ असे टीआरपी असयाचे. तर ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’चा टीआरपी २.असा असायचा.
या आठवड्याच्या सुरुवातीला ‘जिओ हॉटस्टार’चे प्रमुख टीव्ही डिस्ट्रीब्युशनचे पीयूष गोयल यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांना उद्देशून म्हटलं होतं, “तुमच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी२’ हा कार्यक्रम 2.5 TVR मिळवून, गेल्या पाच वर्षांतील सर्वांत मोठा हिंदी GEC फिक्शन शो म्हणून प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यामुळे हे जितकं आमचं यश आहे, तितकंच तुमचंही आहे”.
स्मृती इराणी यांनी नुकताच ‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधताना टीआरपीविषयी सांगतिलं होतं. त्या म्हणालेल्या, ” ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ने टीआरपीचा बार खूप उंचीवर नेला होता.” या मालिकेचा एकेकाळी ३१ इतका टीआरपी होता. त्या म्हणाल्या की, त्यांच्यासाठी २२ हा खूप कमी टीआरपी मानला जायचा. आता या मालिकेला इतका टीआरपी मिळालेला दिसत नाही. अमर उपाध्याय यांनीसुद्धा ‘स्क्रीन’शी संवाद साधताना सांगितलेलं की, पूर्वी म्हणजे २००० साली या मालिकेचा टीआरपी ३२ इतका होता. या मालिकेनं अमिताभ बच्चन यांच्या KBCला फक्त तीन महिन्यांत मागे टाकलं होतं.