Kashmira Kulkarni : मराठी मालिका, नाटक आणि विविध चित्रपटांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच कश्मिरा कुलकर्णी. सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत रम्या ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत कश्मिराने साकारलेलं पात्र सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे. नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा संघर्षाचा काळ सांगितला आहे.
कश्मिरा ४ वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं आणि अभिनेत्री साधारण १७ वर्षांची असताना तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला. लहानपणी वडिलांचं छत्र हरपल्यावर कश्मिरा व तिच्या कुटुंबीयांना सामाजिकदृष्ट्या प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्यात अध्यात्माची आवड ही माझ्या बाबांमुळे निर्माण झाली. त्यांना शुगरचा त्रास व्हायचा, यामुळे ते कोमात गेले होते. आम्ही बाबांचं नेत्रदान केलं होतं आणि मी सुद्धा आता देहदानाचा निर्णय घेतला आहे. बाबा गेल्यावर माझ्या ताईचं लगेच दीड-दोन महिन्यात लग्न झालं. त्यानंतर मी, माझी आई आणि बहीण अशा आम्ही तिघी घरात असायचो.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “ज्या पद्धतीने तेव्हा लोकांच्या नजरा असायच्या… मला खूप राग यायचा. काठी वगैरे घेऊन मी दारात बसून असायचे. कारण, कोणी माझ्या घराकडे, आईकडे वाकड्या नजरेने पाहू नये अशी भावना मनात असायची. तेव्हा मानसिकदृष्ट्या मी खूप तणावात होते, माणसांची वेगवेगळी रुपं पाहायला मिळाली. माझी आई हातगाडी घेऊन काम करायची. एका बाजूला बूट पॉलिश करणं आणि दुसऱ्या बाजूला दागिने, देवाच्या मुर्त्यांना पॉलिश करणं हे काम ती करायची. यामुळे माझंही सोनार काम पक्क झालं. माझ्या आईने खूप मेहनत घेतलीये…परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते.”
“आमच्या घरात काही अशी माणसं आली ज्यांनी कधी मला किंवा आईला किचनमध्ये जाऊ दिलं नाही. उपवास असताना नातेवाईकांनी खिचडी जमिनीवर फेकली अन् ती केरसुणीने सरकवून आता खा…असंही सांगितलं गेलंय. या सगळ्या परिस्थितीतून मी आज इथवर आलेय. एका क्षणाला असंही वाटायचं हे आपल्याबरोबच का होतं? आता जेवायचं काय असाही प्रश्न निर्माण व्हायचा अशावेळी मग आम्ही, हॉटेलमध्ये ज्या बायका जेवण बनवण्यासाठी जातात त्यांना उरलेल्या जेवणाचे डबे भरून देतात. तो डबा एक मावशी १५ रुपयांना आम्हाला आणून द्यायच्या, मग तो १५ रुपयांचा डबा दोन दिवसांनी घ्यायचो. रोज जेवण मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. हे सगळे दिवस पाहिल्याने आज आयुष्य जगताना काहीच कठीण वाटत नाही. पण, आपल्यासारखी वेळ दुसऱ्यावर येऊ नये हा विचार करून मग समाजकार्याच्या दिशेने पावलं वळतात.” असं कश्मिराने सांगितलं.
कश्मिराने अभिनय क्षेत्रात यायचं केव्हा ठरवलं याबद्दल ती सांगते, “आमचं सरकारी शाळेत शिक्षण झालं. बऱ्याचदा वह्या घेण्यासाठी पैसे नसायचे…त्यामुळे मग फळ्यावर वाचून सगळं लक्षात ठेवायचे. त्याचा फायदा आता असा होतो की, तेलुगू, कन्नड कोणत्याही भाषेची स्क्रिप्ट आली की माझं सहज पाठांतर होऊन जायचं. आईची इच्छा असल्याने मला लहानपणापासून ती पथनाट्यात वगैरे सहभागी होण्यासाठी पाठवायची. मी नाटकाच्या स्पर्धा सुद्धा पाहायला जायचे, अभिनयाचे संस्कार माझ्या आईने केलेत. मी अभिनेत्री व्हावं अशी तिची फार इच्छा होती म्हणूनच आईने माझं नाव कश्मिरा ठेवलं होतं.”