Vijay Andalkar & Rupali Zhankar Lovestory : विजय आंदळकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ ही भूमिका साकारत आहे. यातील त्याची व ज्ञानदा रामतीर्थकरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. अशातच विजयने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.
विजय आनंदळकरने दिवाळीनिमित्त सहपत्नीक मुलाखत दिली. यावेळी त्याची बायको अभिनेत्री रुपाली झणकर व त्याने त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. Fun banterला दिलेल्या मुलाखतीत रुपाली म्हणाली, “आम्ही एकत्र मालिकेत काम करत होतो तेव्हाच मला तो आवडायला लागला होता. त्याच्या आधी वर्तुळ मालिकेतील त्याचं काम मला आवडायचं. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते.”
विजय-रुपालीमध्ये आहे १२ वर्षांचं अंतर
रुपाली पुढे म्हणाली, “आमच्यामध्ये १२ वर्षांचं अंतर आहे, पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. मालिकेत काम करत असताना मला तो खूप आवडायला लागला होता. त्यानंतर आम्ही एकमेकांबरोबर जास्त बोलायला लागलो आणि मग हळूहळू गोष्टी पुढे गेल्या. मला तर माहीतही नव्हतं की मी प्रेमात होते ते. मला लोक सांगायचे की तू प्रेमात आहेस.” विजय पुढे म्हणाला, “त्या मालिकेच्या सेटवर आमचे निर्माते हिचे काका होते, ही त्यांची पुतणी आहे. तर ते मला येऊन म्हणाले, ती तुमच्या खूप प्रेमात आहे, जरा बघा, लांब राहा. शेवटी पुतणी; कारण त्यांच्या गावातच शूटिंग सुरू होतं आमच्या मालिकेचं.”
रुपाली पुढे म्हणाली, “मला तो आवडत होता पण पुढाकार त्याने घेतला, कारण माझ्यामध्ये तेवढी हिंमत नव्हती.” विजय पुढे रुपालीला मागणी घालण्याबद्दल म्हणाला, “माझ्या आईनेच मला सांगितलं की, बघ तिला विचार. तर मी तिला विचारलं की माझ्या आईने विचारलंय की लग्न करशील का, तर ती ही हो म्हणाली.”
विजय पुढे रुपालीच्या वडिलांबद्दल म्हणाला, “तिचे वडीलही साधेसुदे नाहीत. ते आले बोलणी सुरू झाली; म्हणाले, हे घर कोणाचं आहे? जागा तुमची आहे का? कागदपत्र दाखव, त्यांनी सगळं तपासलं; आणि मग सगळं ठरलं पण लॉकडाऊन होतं म्हणून लग्न पण खूप घाईत केलं.”
