Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन ट्वि्स्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. पार्थ-काव्या, जीवा-नंदिनी यांची लग्न मनाविरुद्ध झालेली असतात त्यामुळे एवढे दिवस काव्या पार्थपासून घटस्फोट घेण्यासाठी प्रयत्न करत असते. मात्र, पार्थच्या मनातील भावना समजल्यावर काव्याचा विचार बदलतो.

नंदिनीच्या बाबतीत सुद्धा हेच घडतं. जीवाची प्रत्येक गोष्ट नंदिनी आनंदाने समजून घेत असते. मात्र, जीवा छोट्या-छोट्या गोष्टींचा राग नंदिनीवर काढत असतो, तिला लग्न झाल्याबद्दल दोष देतो आणि यामुळेच नंदिनीचा संताप अनावर होतो. ती जीवाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेते. नंदिनीने घेतलेली ही कठोर भूमिका जीवाला अजिबातच मान्य नसते. त्यामुळे बायकोची मनधरणी करण्यासाठी आता जीवा दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.

जीवा नंदिनीसाठी काही चिठ्ठ्या लिहून ठेवतो, तिचा पाठलाग करतो आणि आता शेवटी तो बायकोसाठी पाणीपुरी बनवणार आहे. तुझी आवडती पाणीपुरी, फक्त तुझ्यासाठी असं सांगत जीवा नंदिनीला पाणीपुरी द्यायला जातो. पण, नंदिनी स्पष्ट नकार देत त्याला सांगते, “आवडत्या गोष्टी हसत-हसत सोडाव्या लागतात आणि मी आजपासून पाणीपुरी सोडली” यावरून नंदिनीला या सगळ्याचा किती त्रास होतोय याचा अंदाज जीवाला येतो.

तर, दुसरीकडे पार्थशी बोलण्यासाठी, काव्या त्याच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी घेऊन ऑफिसला जाते आणि त्याला म्हणते, “मी तुमच्यासाठी साबुदाण्याची खिचणी बनवून आणलीये.” यावेळी पार्थच्या केबिनमध्ये त्याचे मदतनीस असलेले काका देखील उभे असतात. पार्थ त्यांना म्हणतो, “काका तुमचा आज उपवास आहे ना? ही घ्या खिचडी आता मला काहीच नकोय”

पार्थची ही वागणूक पाहून काव्या प्रचंड दुखावली जाते. तर, नंदिनीमुळे जीवाचा हिरमोड होतो. आता यांच्या नात्यातील दुरावा केव्हा संपणार, मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका रोज सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. यामध्ये मृणाल दुसानिस, विवेक सांगळे, विजय आंदळकर आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.