Lagnanantar Hoilach Prem Serial : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत हळुहळू पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांचं नातं बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. यांच्यात छान मैत्री झालेली आहे पण, भविष्यात घटस्फोट घेतल्यावर आपण एकमेकांपासून वेगळं होणार याची जाणीवही या चौघांना झालेली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी काव्या लग्नाआधी एका मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सत्य मानिनीसमोर उघड होतं. या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर ये असा सल्ला ती काव्याला देते. मात्र, आता मानिनीचा सुनेबद्दल मोठा गैरसमज होणार आहे.
काव्या आणि जीवाचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. मात्र, परिस्थितीमुळे काव्याचं लग्न पार्थशी होतं तर, जीवा नंदिनीशी लग्न करतो. मनाविरुद्ध लग्न झाल्यावर सुरुवातीला यांच्यात खूप वाद होतात. मात्र, शेवटी जीवा नंदिनीबरोबरचं त्याचं लग्न निभावण्याचा निर्णय घेतो. याचप्रमाणे काव्या सुद्धा जीवाला विसरून आयुष्य नव्याने जगण्याचा निर्णय घेते.
काव्या जीवाबरोबरचा तिचा जुना फोटो जाळून टाकत असते. इतक्यात मानिनी येते…अजूनही काव्या जुन्या आठवणींमध्ये रमलीये असा गैरसमज मानिनी करून घेते. परिणामी, ती संतप्त होऊन काव्याच्या कानशिलात लगावते. तिला वाटतं, अफेअरचं सत्य कोणासमोरही येऊ नये यासाठी काव्या पुरावे जाळून टाकतेय.
मानिनी काव्याला म्हणते, “पुरावे जाळून सत्य लपत नाही. तुझं प्रेमप्रकरण अजूनही चालू आहे.” हा आरोप ऐकून काव्याला अश्रू अनावर होतात. ती खरं सांगण्याचा प्रयत्न करते पण, मानिनी ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते. मानिनी पुढे म्हणते, “आता बास झालं…या मुलाला तू माझ्यासमोर उभं कर…त्याच्या तोंडून मी सत्य काय ते ऐकेन मगच विश्वास ठेवेन”
आता काव्या तिचं अफेअर दुसऱ्या-तिसऱ्या कोणाबरोबर नसून जीवाबरोबर होतं हे मान्य करेल का? ती स्वत:चा भूतकाळ सासूला कसा सांगणार? आणि भविष्यात काव्या आणि जीवाच्या नात्याचं सत्य समोर येताच मानिनी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका रोज संध्याकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.