Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनीचं लग्न एकमेकांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे. मात्र, आता या चौघांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. काव्याने नुकतंच जीवाबरोबरचं प्रेमाचं नातं संपवून टाकल्याचं पाहायला मिळालं.
काव्या पार्थसाठी वटपौर्णिमेची पूजा करते आणि जीवाला थेट सांगते, “माझ्यासाठी यापुढे तू फक्त ताईचा नवरा असशील” असं सांगते. याशिवाय काव्या आता सगळं विसरून पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला घेते.
पार्थ काव्याला पुन्हा एकदा अभ्यास करताना पाहून प्रचंड खूश होतो. तो तिच्या अभ्यासाविषयी चौकशी करतो. यावेळी काव्या त्याला म्हणते, “मी आता सगळं विसरून सरळ मार्गाने चालायचं ठरवलं आहे”
तर, दुसरीकडे नंदिनी जीवाचं कपाट उघडते. यावेळी त्याच्या कपाटातून काव्याने दिलेली भेटवस्तू पडते आणि फुटते. यावेळी जीवाला पटकन जाग येते आणि तो सगळा राग नंदिनीवर काढतो. “आमच्या प्रेमाची शेवटची आठवण होती.. ती सुद्धा आज तुझ्यामुळे उद्धवस्थ झाली” असं तो नंदिनीला सुनावतो.
जीवाचं हे रुप पाहून नंदिनी प्रचंड बिथरते. तिला अश्रू अनावर होतात… जीवाच्या या वागण्यामुळेच मालिकेत नंदिनी एक मोठा निर्णय घेणार आहे. ती जीवाला घटस्फोट द्यायला तयार होणार आहे. इतकंच नव्हे तर नंदिनी याबद्दल थेट जीवाला जाब विचारून कायमचा सोक्षमोक्ष लावणार आहे.
नंदिनी जीवाला म्हणते, “जीवा तुम्ही फक्त म्हणा…नंदिनी दे मला घटस्फोट, मी तुम्हाला मोकळं करेन. तुमच्या आणि त्या मिस ‘K’च्या डोक्यावर मी स्वत: अक्षदा टाकेन. फक्त एकदा मनापासून मला सांगा… तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट हवाय का?” आता नंदिनीच्या या प्रश्नावर जीवा काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, साध्याभोळ्या नंदिनीचं हे कणखर रुप पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा हा विशेष भाग या आठवड्यात संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.