Mrunmayee Gondhalekar Praises Nitish Chavan: ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत नितीश चव्हाण व मृण्मयी गोंधळेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत काम करताना दिसत आहे. या कलाकारांनी त्यांच्या भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकली.
नितीश चव्हाणने या मालिकेत सूर्या दादा ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने तुळजाची म्हणजेच सूर्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सूर्या त्याच्या बहिणींवर तसेच त्याच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करतो. त्याच्या बहिणींना सांभाळतो, त्याच्या पत्नीला तुळजाला जीव लावतो. तुळजादेखील त्याला साथ देताना दिसते. त्याच्या कुटुंबाला तिने मनापासून आपलंस मानलं आहे. सूर्याच्या बहिणींना आईची माया देतो. वेळोवेळी त्यांना पाठिंबा देते.
नितीश चव्हाणबद्दल मृण्मयी गोंधळेकर काय म्हणाली?
आता एका मुलाखतीत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने तिच्या सहकलाकाराबद्दल म्हणजेच नितीश चव्हाणबद्दल वक्तव्य केले आहे. नितीश चव्हाण व मृण्मयी गोंधळेकर यांनी नुकताच तारांगणशी संवाद साधला. यावेळी मृण्मयी गोंधळेकर म्हणाली, “नितीश एक उत्तम कलाकार आहे. तो अष्टपैलू अभिनेता आहे. त्याला दु:खी सीन जितका चांगला करता येतो, तितकाच त्याला आनंदी सीनही चांगला करता येतो. अशा सगळ्या पद्धतीचे सीन तो उत्तम पद्धतीने करू शकतो, त्यामुळे मला वाटतं तो अष्टपैलू अभिनेता आहे. आणि माणूस म्हणून जेंटलमन आहे. एकूणच तो चांगला अभिनेता व चांगला मित्र आहे.”
याच मुलाखतीत नितीशने सातऱ्याबद्दल वक्तव्य केले. नितीश म्हणाला, “माझी पहिली मालिका लागिरं झालं जी ही साताऱ्यातच शूट झाली होती आणि लाखात एक आमचा दादा ही मालिकासुद्धा साताऱ्यातच शूट होत आहे. त्यामुळे माझं करिअरच साताऱ्यातून सुरू झालं आहे. त्यामुळे सातारा मला खूप प्रिय आहे.” तर मृण्मयी साताऱ्याबद्दल म्हणाली, “पुणे-मुंबईत कायमच धावपळीचं जीवन असतं. पण, सातारा छान आहे. इथे शुद्ध हवा आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्ही शूटिंग करतो. त्यामुळे साताऱ्यात शूटिंग करायला मला मजा येतेय.”
दरम्यान, लाखात एक आमचा दादा मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसत आहेत. या मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.