सध्या मालिकांच्या टीआरपीमध्ये सातत्य राखण्यासाठी प्रत्येक वाहिनीकडून नवनवीन प्रयोग करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे टीआरपीमध्ये पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणण्यासाठी ‘झी मराठी’कडून सुद्धा जोरदार प्रयत्न चालू आहेत. आता लवकरच एक जबरदस्त मालिका ‘झी मराठी’वर सुरू होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेची जोरदार चर्चा चालू आहे आणि यामागे कारणही तसंच आहे. ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण या मालिकेमार्फत ‘झी मराठी’वर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने लागिरं मालिकेत साकारलेली अज्या ही भूमिका आजही सर्व प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नितीशबरोबर या मालिकेत दिशा परदेशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा : “मी एका ठराविक आडनावाची आहे म्हणून मला…”, इंटस्ट्रीतील भेदभावाबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर स्पृहा जोशीने मांडलं मत

चार बहिणींचा सांभाळ करणारा, आपल्या बहिणींना आईची माया देणाऱ्या भावाची कथा या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नितीश या मालिकेत सूर्यादादाची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी सूर्या दादाच्या बहिणीच्या रुपात झळकणार आहेत.

हेही वाचा : “त्याने मला सोडलं आणि पुन्हा लग्न केलं”, ट्रोल करणाऱ्याला प्रसिद्ध अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीने सुनावलं; म्हणाली, “अशी मूर्खासारखी…”

गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या मुहूर्ताची तारीख निर्मात्यांकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. ही तारीख नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला. या पोस्टरमध्येच मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख दडली आहे. अगदी बारकाईने लक्ष दिल्यास दिशा परदेशीच्या बरोबर मागे लहान अक्षरात १ जुलै २०२४ ही तारीख लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेवर येत्या जुलैपासून सुरू होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

हेही वाचा : श्रीवल्लीच्या ‘अंगारों’ गाण्यात मराठमोळा ठसका! अर्जुन-सावीने केला जबरदस्त डान्स, अवघ्या काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी ही तारीख कमेंट सेक्शनमध्ये अगदी अचूक ओळखली आहे. युजर्सनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी अप्पी मालिका बंद करू नका अशी विनंती वाहिनीकडे केली आहे. आता ही नवीन मालिका सुरू झाल्यावर ‘झी मराठी’ची कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.