Lakshmi Niwas fame actor’s post for Vijaya Babar: नवनवीन मालिकांमुळे प्रेक्षक टेलिव्हिजनबरोबर कायम जोडले जातात. एक नवीन गोष्ट, नवीन कलाकार, त्यांचा प्रवास पाहण्यात प्रेक्षक गुंतून जातात. आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक नवीन मालिका भेटीस आली आहे. कमळी असे या मालिकेचे नाव असून झी मराठी वाहिनीवर ३० जून पासून प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची मोठी चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. झी मराठीच्या इतर मालिकांमधून कमळीचे प्रमोशन पाहायला मिळाले. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतदेखील कमळीची एन्ट्री पाहायला मिळाली होती. आता लक्ष्मी निवास मालिकेतील एका कलाकाराने कमळीसाठी म्हणजेच अभिनेत्री विजया बाबरसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

“किमान वेळेत कमाल हसण्याचे विक्रम मोडले”

लक्ष्मी निवास मालिकेतील आनंद प्रभू या अभिनेत्याने विजया बाबरबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले, “एकदा मैत्रीच्या गाठी जुळल्या कि मग वारंवार भेटी नाही झाल्या तरी चालतात.”

पुढे अभिनेत्याने लिहिले, “प्रिय विजया. तुझी नवीन मालिका कमळी ही झी मराठी वाहिनीवर येतेय, त्यासाठी तुला आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने तू ‘लक्ष्मी निवास’च्या सेटवर आलीस. अगदी कमी वेळेसाठी आपली भेट झाली. पण, पोटभर हसून घेतलं. किमान वेळेत कमाल हसण्याचे विक्रम मोडले. मध्येच भावुक हो डोळ्यांचे काठही अकस्मात ओलावले गेले. “

“आपली मैत्री ही जन्मोजन्मीची आहे, यात शंका नाही. तुझी मेहनत, क्षमता,सातत्य,आत्मविश्वास आणि कायम सकारात्मकता पसरवणारी तुझी ऊर्जा यामुळे यशस्वी होण्याचे आणि उज्जवल भविष्याचे संकेत वेळोवेळी ईश्वर देत राहीलच.”

“या मालिकेत कमळीची आईची भूमिका अभिनेत्री योगिनी चौक साकारत आहे. तीसुद्धा माझी खास मैत्रीण आहे. तिलासुद्धा खूप शुभेच्छा. नवीन सुरुवातीसाठी कमळीच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आनंद प्रभूच्या या पोस्टवर विजयाने कमेंट करीत लिहिले, “आनंद, किती छान लिहिलं आहेस. माझ्या संपूर्ण प्रवासात खास मित्र म्हणून तुझा खूप मोठा वाटा आहे. तू बेस्ट आहेस”, तर अभिनेत्री योगिनी चौकने लिहिले की मित्रा खूप धन्यवाद.

दरम्यान, कमळी ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.