Lakshmi Niwas fame Divya Pugaonkar and Anuj Prabhu praises Meghan Jadhav: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मी व श्रीनिवासचे कुटुंब विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असते. मध्यमवर्गीय कुटुंबातील लक्ष्मी व श्रीनिवास घराला जोडून ठेवण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या आनंदासाठी कष्ट करतात.
जेव्हा जेव्हा मुलं चुकीचं काहीतरी करतात, तेव्हा तेव्हा ते त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देत, त्यांना शिक्षादेखील देतात. या सगळ्यात जयंत व जान्हवीची जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. जयंत जान्हवीवर खूप प्रेम करतो, तिच्याशी प्रेमाने वागतो, मात्र अनेकदा तो तिच्याशी विकृत पद्धतीनेदेखील वागतो.
जान्हवी जर इतर कोणाशी चांगलं वागत असेल, तर त्याला राग येतो. जान्हवीने जर त्याच्यापेक्षा इतर कोणाला जास्त महत्त्व दिले तर त्याला ते आवडत नाही. त्यानंतर तो त्या संबंधित व्यक्तीला आणि जान्हवीला शिक्षा देतो. त्यामुळे जान्हवी त्याला बऱ्याचदा घाबरताना दिसते. दुसरीकडे, जान्हवी व विश्वाची मैत्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. जान्हवीवर त्याचे प्रेम होते, मात्र विश्वा त्याच्या भावना सांगू शकला नाही. आता या कलाकारांचे एकमेकांबरोबर ऑफस्क्रीन नाते कसे आहे, त्यांच्यात कसे बॉण्डिंग आहे, हे विश्वा, जान्हवी व जयंत यांनी सांगितले आहे.
‘लक्ष्मी निवास’ फेम विश्वा व जान्हवीचे जयंतबद्दल वक्तव्य
‘लक्ष्मी निवास’ मधील जान्हवी, विश्वा व जयंत यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत मालिकेतील विश्वा म्हणजेच अनुज प्रभू म्हणाला, “मेघन जयंत हे पात्र साकारत आहे. आज जर त्याला शिव्या पडत असतील तर त्याचं कारण हेच आहे की तो ते पात्र खूप छान साकारत आहे. तो दिसतो इतका देखणा की कोणाला असं स्वप्नातही वाटणार नाही की तो असं काही करेल, त्यामुळे तो जे पात्र साकारत आहे, ते कौतुकास्पद आहे.”
मालिकेतील जान्हवी म्हणजे दिव्या पुगावकर म्हणाली, “मेघन जे जयंत हे पात्र साकारत आहे त्याच्या अगदी विरुद्ध तो खऱ्या आयुष्यात आहे. त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण एका मृदू स्वभावाच्या माणसाला जेव्हा असं काहीतरी पात्र साकारायला मिळतं, तो ज्या पद्धतीने ते पात्र उभं करतोय, प्रेक्षक खूप शिव्या देतात, पण ही त्याच्या कामाची पावती आहे.”
सेटवर जान्हवीबरोबर बॉण्डिंग कसे आहे? यावर अनुज म्हणाला, “आमच्यामध्ये जे बॉण्डिंग आहे, त्याचं श्रेय दिव्याला जातं. तिने याआधीही प्रमुख भूमिकांत काम केले आहे. मी जेव्हा पहिल्या दिवशी सेटवर आलो तेव्हा मी फार बोलायचो नाही. पण, ज्या पद्धतीने माझं स्वागत केलं, ती माझ्याशी बोलली, पण मी एका शब्दात उत्तर द्यायचो.”
मेघन जाधव अनुज प्रभूबरोबर असलेल्या बॉण्डिंगबाबत म्हणाला, “आम्ही कितीदातरी व्हॅनिटी शेअर करतो. आम्ही दोघेही चित्रपटप्रेमी आहोत, तर आमची सतत कुठल्या ना कुठल्या चित्रपटाबाबत चर्चा सुरू असते. ऑफस्क्रीन आमची चांगली मैत्री आहे. ऑनस्क्रीन सध्या जो ट्रॅक सुरू आहे, तो पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे.”
दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय होणार, विश्वा हाच जान्हवीचा जवळचा मित्र असल्याचे समजल्यानंतर जयंत काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.