Lakshmi Niwas fame Swati Deval shares experience: चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजनमधील कलाकार त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करतात. मालिकांमध्ये दिसणारे कलाकार तर प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनतात.
टेलिव्हिजनवर साकारत असलेले अनेक कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार ओळखले जातात. चाहते अनेक गोष्टी आपल्या आवडत्या कलाकारांसाठी करताना दिसतात. आपले आवडते कलाकार समोर दिसल्यानंतर अनेक चाहते भावूक होतात. आता ‘लक्ष्मी निवास’फेम अभिनेत्री स्वाती देवलने एक किस्सा सांगितला आहे.
“त्यांचं त्या वहिनीवर…”
अभिनेत्री स्वाती देवलने नुकताच ‘तारांगण’शी संवाद साधला. अभिनेत्री म्हणाली, “‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मी जी भूमिका साकारली होती, ती तिला आवडतील त्या दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन जाते, असं होतं. एकदा मी बाजारात खरेदीला गेले होते. भाजी घेत होते. एक भाजीवाली बाई मला म्हणाली की, मी डोळ्यांवर हात ठेवते. तू ही भाजी घेऊन जा. त्या असं का बोलत होत्या, ते मला ते कळलंच नाही. नंतर कळलं की, त्या मालिकेत मी मीनाक्षी ही भूमिका साकारली होती. मीनाक्षीवहिनी तशी होती. त्यांचं त्या वहिनीवर प्रेम होतं. मी त्यांना सांगितलं की, मी स्वाती देवल आहे. मी पैसे देऊन भाजी विकत घेणार आहे.”
नुकतीच एक घटना घडली. एका बाईंनी पाठीमागून माझ्या पाठीवर जोरात मारलं आणि त्यांनी मला अनिता म्हणून हाक मारली. ती मला अनिता म्हटली याचं कारण असं होतं की, २००७ साली मी कळत-नकळत या मालिकेत मी अनिता अभ्यंकर ही भूमिका साकारली होती. त्या आजी होत्या. त्यांना ती मालिका आठवत होती. त्या मला म्हणाल्या की, आता मंगल ही भूमिका करीत आहेस. आधी मीनाक्षीवहिनी, कांता अशा विविध भूमिका केल्यास. तर तू कसं काय एवढ्या वेगवेगळ्या भूमिका साकारतेस, असे प्रश्न लोक विचारतात. प्रेक्षकांना मी वेगळी जाणवते, हे ऐकल्यानंतर मला मजा येते. मी ते पात्र साकारताना मी त्यांच्यातील, त्यांच्या घरातील वाटते म्हणून ते माझ्याशी बिनधास्त येऊन बोलतात.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत दिसले होते. स्वाती देवलने या मालिकेत प्रार्थनाच्या वहिनीची भूमिका साकारली होती. ही मालिका मोठी गाजली होती.
आता अभिनेत्री स्वाती देवल लक्ष्मी निवास या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मंगल ही भूमिका तिने साकारली असून, लक्ष्मी व श्रीनिवास यांची ती मोठी मुलगी आहे. थोडी स्वार्थी, लालची स्वभावाची, आई-वडील किंवा माहेरचा विचार न करता, स्वत:ला हव्या असलेल्या गोष्टी ती हट्टाने सासरी घेऊन जाते.
लक्ष्मी निवास मालिकेत अभिनेते तुषार दळवी व अभिनेत्री हर्षदा खानविलकर प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. त्यांनी लक्ष्मी व श्रीनिवास भूमिका साकारली आहे. लक्ष्मी व श्रीनिवास संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा ते त्यांच्या मुलांमुळे संकटात सापडतात. संतोष व हरीश ही त्यांची मुले पैशांसाठी काहीही करायला तयार होतात. आता मालिकेत लक्ष्मी कडकलक्ष्मीच्या रूपात दिसणार आहे. त्यामुळे काय गमती-जमती घडणार, संतोषच्या वागण्यात काही बदल होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.