‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेच्या टीमने नुकतंच मेघन व अनुष्का यांचं एकत्रित केळवण केलं. यावेळी ‘लक्ष्मी निवास’चे बहुतांश कलाकार उपस्थित होते.

मेघन जाधव लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरशी लग्नगाठ बांधणार आहे. सध्या अनुष्का ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मेघन व अनुष्का यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेपासून झाली होती. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता नोव्हेंबर महिन्यात हे सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

मेघन व अनुष्काच्या केळवणाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये एका खास गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या गाण्यात मेघन व अनुष्काची यांची थोडक्यात लव्हस्टोरी सांगितली आहे.

मेघन जाधव व अनुष्का पिंपुटकरसाठी खास गाणं

मनीष रावांची कन्या आज अनुष्का झाली वधू
जाधवांचा मेघन आला घेऊन प्रीतीचा मधू
पुण्याहून मुंबईला जुळले एक नाते
केळवणाची ही धूम
सूर नवे गाते…

ती पुण्याची, तो मुंबईचा
पण मनं झाली एक
कामातील भेटीगाठी झाल्या आयुष्याचा टेक
अनुष्का तू रुपवान, तू तर आहेस सुंदर
मेघनच्या जीवनाला आला तुझ्यामुळे बहर
कधी रुसणे, कधी हसणे…कधी सिक्रेट मीटिंग्ज खास
रिटेक्स नाही आता…हा तर जीवनाचा प्रवास!
दोघांनाही खास शुभेच्छा!

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर मेघन जाधव सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारतोय आणि अनुष्का स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत झळकत आहे.