Lakshmi Niwas Marathi Serial : हरीशने स्वत:च्या बायकोचे दागिने चोरी करून विकल्यामुळे सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील दळवी कुटुंब अस्थिर झालं आहे. तर, दुसरीकडे लक्ष्मीची मोठी लेक भावना तिच्या गळ्यात नकळत कोणी मंगळसूत्र घातलंय याचा शोध घेत आहे. मात्र, आता लवकरच भावनासमोर सगळं सत्य उघड होणार आहे.
देवीच्या उत्सवात सिद्धूला भावनावर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. यादरम्यान, भावना डोळे बंद करून नामस्मरण करत असते. इतक्यात सिद्धू मंदिरात येतो. खरंतर त्याआधी तो आपल्या मनातील भावनाविषयीचं प्रेम लक्ष्मी अन् त्यानंतर जान्हवीसमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. पण, उत्सवाच्या ठिकाणी, भर गर्दीत… धावपळीत त्याला ते शक्य होत नाही आणि शेवटी सिद्धू भावनाच्या गळ्यात सर्वांच्या नकळत मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतो.
जप पूर्ण झाल्यावर जेव्हा भावना गळ्यातील मंगळसूत्र पाहते तेव्हा ती प्रचंड अस्वस्थ होते, रडू लागते. सगळा दोष नशिबाला देते. घरचेही तिच्यावर रागवतात…पण, या सगळ्यात लक्ष्मी आणि श्रीनिवास लेकीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात. जोवर मंगळसूत्राची जबाबदारी घेणारा माणूस समोर येत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय काढणार नाही असा निर्णय भावनाने घेतलेला असतो.
आता लवकरच ज्या क्षणाची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत येणार आहे. सिद्धू भावनासमोर प्रेमाची कबुली देऊन, मंगळसूत्राचं सत्य उघड करणार आहे.
सिद्धू म्हणतो, “मी माझ्या आणि पूर्वीच्या लग्नासाठी नकार देतोय कारण, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा दुसरा-तिसरा कोणी नसून मीच आहे.” या सगळ्या गोष्टी ऐकून भावनाला धक्का बसतो. आता भावना या नात्याचा स्वीकार करणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, आता भावनाला मंगळसूत्राचं सत्य समजल्यावर ती काय निर्णय घेणार? सिद्धूला माफ करणार की नाही? या सगळ्यावर दळवी व गाडेपाटील कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असेल या गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेत होणार आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.