Lalbaugcha Raja Visarjan 2025 Marathi Actress Post : मुंबईसह राज्यभरात गेले ११ दिवस मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी सुरू झाली होती. मात्र, यंदा राजाची मिरवणूक फारच लांबल्याचं पाहायला मिळालं. तब्बल ३३ तासांनंतर ७ सप्टेंबरला रात्री ९ च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं.
लालबागचा गणेशोत्सव हा नेहमीच सर्व भाविकांमध्ये चर्चेचा विषय असतो. लालबाग परिसरातील सगळ्याच मंडळांचे गणपती पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी होते. दरम्यान, यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन निर्धारित वेळेत न झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
७ सप्टेंबरला सकाळी गिरगाव चौपाटीवर राजाचं आगमन झाल्यावर पुढे अवघ्या १ ते २ तासात राजाचं विसर्जन होणं अपेक्षित होतं. मात्र, यादरम्यान समुद्राला मोठी भरती आणि त्यानंतर राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन लांबलं. यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक खास आणि आधुनिक तराफा निर्माण करण्यात आला होता. याची निर्मिती गुजरातमध्ये करण्यात आली होती. हा तराफा स्वयंचलित असून याला समुद्रात जाण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या बोटीची गरज लागत नाही. तो स्वतःच पुढे जातो आणि कॅप्टन त्याला कंट्रोल करतात. सकाळी तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी निर्माण झाल्यामुळेच लालबागचा राजाचे विसर्जन होण्यास विलंब होत असल्याचं म्हटलं गेलं. याशिवाय गेली अनेक वर्षे राजाचं विसर्जन करणाऱ्या गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती आणि आधुनिक तराफ्यातील तांत्रिक अडचणींमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं म्हटलं.
आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सोळंकीने यावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. आरती लिहिते, “बहुतेक गुजरातवरून विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागच्या राजाला आवडला नसावा… राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना…काय करणार”

दरम्यान, ३३ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला आहे. याशिवाय आरती सोळंकीबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावरच्या अनेक विनोदी कार्यक्रमांमधून आरती घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय ती ‘बिग बॉस मराठी’मध्ये देखील झळकली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सामाजिक तसेच मनोरंजन विश्वातील घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरती नेहमीच स्पष्ट मत मांडताना दिसते.