छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला वेगळी ओळख मिळवून दिली. याचबरोबर तिचा चाहतावर्ग ही प्रचंड वाढला. मधुराणी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती उत्तम अभिनय करते, उत्कृष्ट गाते, खूप चांगल्या कविताही करते. पण मधुराणी इतकीच तिची मुलगीही खूप टॅलेंटेड आहे.
मधुराणी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. सोशल मीडियावरूनच ती तिच्या मुलीबद्दलचंही प्रेम अनेकदा व्यक्त करत असते. मालिकेच्या शूटिंगमुळे मधुराणी मुंबईत राहते, तर तिची मुलगी पुण्यात तिच्या कुटुंबीयांबरोबर राहते. पण मधुराणी शक्य होईल तितका जास्त वेळ तिच्या मुलीला देण्याचा प्रयत्न करत असते. तर आता गणपतीनिमित्त तिच्या मुलीने एक नाटक बसवलं असल्याचं मधुराणीने सांगितलं.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मधुराणीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये ती म्हणाली, “गणपतीसाठी माझ्यापेक्षा माझी मुलगी जास्त उत्सुक आहे. तिला सगळे सण थाटामाटात साजरे करायला खूप आवडतात. यावर्षी तिने गणपतीसाठी एक नाटक बसवायला घेतलं आहे आणि मी जेव्हा पुण्यात जाते तेव्हा त्या नाटकातले संवाद ती मला म्हणून दाखवते, ते कसं बसवायचं हे ती मला विचारत असते.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मधुराणीने तिच्या मुलीबरोबर ऑस्ट्रेलियाची ट्रिप केली. ती कामानिमित्त तिथे गेली होती पण तिथे जाताना ती तिच्या मुलीलाही बरोबर घेऊन गेली होती. ते पंधरा-वीस दिवस त्या माय-लेकींनी एकमेकींबरोबर खूप छान वेळ घालवला होता.