Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor On TypeCasting : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमानं प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे. त्यातील प्रत्येक कलाकाराचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी यामध्ये सादर केलेले भन्नाट स्किट प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहताना दिसतात. अशातच यातील एका अभिनेत्यानं यामुळे साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकण्याच्या भीतीबद्दल सांगितलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात आपल्या विनोदी शैलीनं अनेकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे निमिश कुलकर्णी. निमिश या कार्यक्रमातील कामामुळे घराघरात पोहोचला. त्यातील त्याच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं. परंतु, आता निमिशनं कॉमेडी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यातील कलाकारांबद्दल सांगितलं आहे. त्यानं साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकण्याची भीती असल्याचं म्हटलं आहे.

साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकण्याच्या भीतीबद्दल निमिश कुलकर्णीची प्रतिक्रिया

निमिशनं नुकतीच ‘अल्ट्रा मरठीला’ मुलाखत दिली. त्यामध्ये त्याला “तुला साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकण्याची भीती किंवा अशा भूमिकांमुळे साचेबद्ध भूमिकांचा शिक्का बसण्याची भीती होती का?” असं विचारण्यात आलं होतं. त्यावर निमिश म्हणाला, “साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकण्याची भीती माझ्या मते या फॉरमॅटमध्ये जास्त असते. मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत काम केलं होतं. ‘मनं सुद्ध तुझं’ या सीरिजच्या एका एपिसोडमध्येही काम केलं होतं. त्यातलं माझं काम खूप वेगळं होतं. त्यासह एक चित्रपट केला आहे, जो प्रदर्शित होईल. त्यातही वेगळं काम आहे. या बाबतीत मला सचिन गोस्वामीसरांचं एक वाक्य फार आवडतं”.

सचिन गोस्वामी यांच्याबद्दल तो पुढे म्हणाला, “त्यांनी सांगितलेलं की, एखाद्या कार्यक्रमात किंवा या प्रकारच्या इतर शोमध्ये कॉमेडियन असतात हा भ्रम आहे आणि तो काढून टाकला पाहिजे. कॉमेडियन असणं वेगळं आणि अभिनेता असणं वेगळं. त्यामुळेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सगळ्या कलाकारांना तुम्ही वेगळ्या पद्धतीची कामं करतानाही बघता. काही नाटकात, काही मालिकांत, तर काही चित्रपटांत काम करत आहेत, ज्यामधील त्यांच्या भूमिका या कार्यक्रमातील पात्रांपेक्षा खूप वेगळ्या असतात. तरीसुद्धा त्या भूमिका इतक्या चांगल्या होतात. कारण- कलाकाराचं कामच हे असतं की, त्याच्याकडे आलेलं काम नीट करणं, त्याला पूर्णत्वास नेणं.”

निमिश पुढे म्हणाला, “कॉमेडियन हा प्रकारच आपल्याकडे खूप वेगळा आहे. त्यामुळे माझ्या मते साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकण्याची भीती ही हळूहळू कमी होत गेली आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की, आपल्याकडे दुर्दैवानं पटकन असं म्हटलं जातं की, अरे हा तर स्किट करतो किंवा हा असंच काम करतो. त्याची गरज नाहीये. कारण- आपल्याकडे ऑडिशन नावाची पद्धत आहे ना. मग तुम्ही कलाकारांवर कुठल्या तरी एकाच पठडीतल्या भूमिकांचा शिक्का का लावता? असं असेल तर मग ऑडिशन घेणं बंद करा. ऑडिशन घ्या. त्यातही जर तुम्हाला वाटलं की, त्यानं त्या शोमध्ये केलं, तसंच काम केलंय. तर तुम्ही नाही म्हणा ना. त्यामुळे या गोष्टीची भीती होती; पण ती आता हळूहळू कमी होत चालली आहे.”

निमिश पुढे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ व ‘चला हवा येऊ द्या’बद्दल म्हणाला, “या कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी गंभीर भूमिका किंवा सीन केले आहेत. सागर कारंडेने किती वर्षे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पत्र वाचलं; मग तुम्ही कसं म्हणता की, तो कॉमेडियन आहे. भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके यांनीसुद्धा इतर कामं केलीच आहेत.”

निमिश म्हणाला, “कॉलेजमध्ये असताना आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करण्यापूर्वी मी कधीच कॉमेडी किंवा विनोदी भूमिका केली नव्हती. मी अचानक ही ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. त्यामुळे गंभीर भूमिका किंवा इतर पद्धतीचं काम मला येणारच नाही, असं नव्हतं. त्यामुळे मला दडपणही जाणवलं नाही.”