Star Pravah Marathi Serial : छोट्या पडद्यावरच्या मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही रंजक गोष्टी घडत असतात. सध्या बहुतांश मालिकांमध्ये लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, काही मालिकांमध्ये सध्याच्या नव्या ट्रेंडनुसार नवनवीन स्पर्धा सुरू असल्याचा ट्रॅक सुरू होत आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं, तर ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये एक अनोखी स्पर्धा सुरू झालेली आहे याविषयी जाणून घेऊयात…

रेश्मा शिंदे व सुमीत पुसावळे यांची मुख्य भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या कौटुंबिक मालिकेत धाकट्या जाऊबाईंमुळे जानकीच्या आयुष्यात येणारे अडथळे, घराला जोडून ठेवण्याची धडपड या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत ‘श्री. आणि सौ. मुळशी’ ही अनोखी स्पर्धा सुरू झालेली आहे. यानिमित्ताने यामध्ये एका खास अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ‘श्री. आणि सौ. मुळशी’ या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून, यामध्ये जानकी-हृषिकेश, सारंग-ऐश्वर्या ही मंडळी जोडीने सहभागी झाली आहेत. ऐश्वर्या काही ना काही खुरापती करून ही स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात असल्याचं सध्याच्या काही प्रोमोंमध्ये पाहायला मिळतंय. पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये एका खास व्यक्तीची झलक पाहायला मिळत आहे.

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा विविध कार्यक्रमांमुळे तसेच रंगभूमीवरील नाटकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच अंशुमन विचारे. आपल्या दमदार विनोदशैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये येणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना अंशुमनची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनेता मालिकेतील ‘श्री. आणि सौ. मुळशी’ ही स्पर्धा होस्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंशुमनला छोट्या पडद्यावर पाहून त्याच्या चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील ‘श्री. आणि सौ. मुळशी’ या स्पर्धेत जानकी-हृषिकेश की ऐश्वर्या-सारंग या दोन जोड्यांमध्ये कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.