Esha Dey on trolling: सोशल मीडियावर जितके कौतुक होते, तितकेच ट्रोलिंगदेखील होते, याचा अनुभव अनेकांना आहे. काही जण याविरुद्ध बोलतात; तर काही जणांवर ट्रोलिंगचा परिणामदेखील होतो. कलाकारांनादेखील याचा सामना करावा लागतो.

ईशा डे काय म्हणाली?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री ईशा डेने नुकताच ‘बोल भिडू’ या चॅनेलवर समीर चौगुले यांच्याशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री ईशा डेने ट्रोलिंगबाबत वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात काम करायला सुरुवात केल्यानंतर अगदी पहिल्या-दुसऱ्या स्कीट्सनंतर मी यूट्यूबवर कमेंट पाहिल्या होत्या. त्या स्कीटमध्ये असं होतं की, हसणारा सोफा, बिन बॅग असं सगळं होतं. त्यावर कमेंट्समध्ये माझ्या हसण्यावरून वगैरे खूप वाईट लिहिलं होतं. हिला अॅक्टिंगचा ए तरी येतो का? ही कोण आणलीय? ही गोस्वामींची नातेवाईक असणार, असं डेंजर लिहिलं होतं. हसण्यावरून खूप बोलले होते.”

पुढे ईशा डे म्हणाली, “त्यानंतरच्या स्कीटवेळी सर असं म्हणाले की, ते तुझं हसणं वापर. तर मी म्हणाले की, लोक वाईट बोलत आहेत, तरीसुद्धा करायचं का? तर सर म्हणाले, ते लोक काय बोलतात, त्यावरून ठरवणार का, की काय करायचं? आम्ही सांगतोय ना, विश्वास ठेव. करायचं. वापरायचं, यालाच तू तुझी ओळख बनव. मुळात मी सोशल मीडियामध्ये अडकणारी नाही.”

पुढे समीर चौगुले म्हणाले की, काही पोस्ट फक्त टीका करणाऱ्या नसतात, तर अश्लाघ्य असतात. तशा कमेंट्स वाचल्यावर त्याचा त्रास होत नाही का? त्यावर ईशा म्हणाली, “अशा कमेंट्स करणाऱ्यांची मला दया येते. मला असं वाटतं की, बिचारा त्रासातून जातोय. नॉर्मल माणूस एवढं घाणेरडं कसं लिहू शकेल? ही व्यक्ती लवकर बरी होऊ दे, असं म्हणून मी कमेंट डिलीट करते. कारण- आपण त्या कमेंटवर उत्तर द्यावं, हेच लोकांना हवं असतं. ते मिळवून कशाला द्यायचं?”

समीर चौगुले म्हणाले की, मीदेखील या सगळ्यातून गेलेलो आहे. पण, सर एकदा म्हणाले होते की, जशी लोकप्रियता वाढते, तसे ट्रोलर्सदेखील वाढतात. काही जण ठरवून करतात. अनेक पोस्ट असतात. जसं की यांचं खूप झालं. नवीन लोकांना संधी द्या. मी संधी अडवून बसलोय, असं त्यांचं म्हणणं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, या इंडस्ट्रीमध्ये कोणी कोणाची जागा अडवू शकत नाही.

दरम्यान, समीर चौगुले, ईशा डे, सई ताम्हणकर, प्रसाद ओक हे कलाकार गुलकंद या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून अनेक कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. प्रत्येक कलाकाराची एक अनोखी स्टाईल असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे हे कलाकार आता घराघरात पोहोचले आहेत. या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते.