संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाने वेड लावणारा अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर परतला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याची हास्यजत्रेच्या मंचावर रिएन्ट्री होणार आहे. ही शोच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या शोमुळे ओंकार भोजने घराघरांत पोहोचला. अल्पावधीतच त्याचे हास्यजत्रेतील स्किट्स, संवाद सर्वत्र हिट झाले होते.
‘अगं अगं आई…’ म्हणणारा ओंक्या असो वा ‘हा इथे काय करतोय’ विचारणाऱ्या मामाची भूमिका… भोजनेने आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ओंकारने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रेक्षकांच्या या मागणीला मान देत ओंकार भोजने पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परतला आहे.
हास्यजत्रेत रिएन्ट्री घेण्याविषयी ओंकार भोजने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “हास्यजत्रेत परफॉर्म करण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे आणि मला तेवढंच दडपण सुद्धा आलं आहे. कारण, पुन्हा एकदा मला त्याच एनर्जीने काम करायला सुरुवात करायची आहे. किती नाही म्हटलं तरी मी थोडा मागे पडलोय कारण, त्यांची खूप छान भट्टी जमलीये. माझ्या सेमिस्टर, प्रॅक्टिकल सगळंच बाकी आहे. ते सगळं आता मला पूर्ण करायचं आहे. आता ती सगळी मजा मला पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. त्यात प्रेक्षकांचा खूप चांगला पाठिंबा मिळालाय. त्यामुळे मी अजून काहीतरी चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करेन.”
ओंकार पुढे म्हणाला, “जेव्हा मी हास्यजत्रेत नव्हतो तेव्हा सुद्धा मी एक प्रेक्षक म्हणून हा शो फॉलो करत होतो. दिवसभर काहीही केलं तरी रोज रात्री ९ वाजता मी हास्यजत्रा पाहायचो… कोणत्या एपिसोडमध्ये काय आहे हे मी नक्की सांगू शकतो. त्यामुळे हास्यजत्रा पाहणं हा माझ्या रुटिनचा एक भाग आहे. ओंकार परत आला…परत आला हा आनंद सगळ्यांनाच झालाय. हे प्रेम पाहून मलाही छान वाटलं. सोनी मराठीसारख्या एका मोठ्या वाहिनीने, आमच्या शोने मला इतकं छान वेलकम करणं ही भावना खूपच भारी आहे.”
ओंकारच्या रिएन्ट्रीमुळे कार्यक्रमाची रंगत आता पुन्हा एकदा वाढणार अशा चर्चा सर्वत्र रंगत आहेत. अभिनेत्याच्या घरवापसीमुळे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. ओंकारचे गाजलेले स्किट, त्याचा ‘साइन, कॉस, थिटा’ हा डायलॉग या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पुन्हा एकदा शोमध्ये अनुभवता येणार आहेत.
