‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले आहेत. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. यामधील एक म्हणजे पृथ्वीक प्रताप.

आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक आज लोकप्रिय झाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ व्यतिरिक्त पृथ्वीक आता मोठं-मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत आहे. नुकतीच त्याची पहिली-वहिली डिजिटल जाहिरात प्रदर्शित झाली. जाहिरातीचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जाहिरातीत पृथ्वीकसह अभिनेत्री आकांक्षा गाडे झळकली आहे.

हेही वाचा – “राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्यांची लाज वाटते,” मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, असं का म्हणाली? जाणून घ्या…

पृथ्वीकची पहिली डिजिटल जाहिरात पाहून हास्यजत्रेतील कलाकारांसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. निखिल बनेनं लिहिलं आहे, “व्वा भावा कमाल.” तर प्राजक्ता माळीने लिहिलं आहे, “छान” आणि इमोजी दिला आहे. तसेच प्रियदर्शनी इंदलकरने लिहिलं आहे, “हे खूप भारी आहे. असंच काम कर मित्रा.” याशिवाय चाहते पृथ्वीकच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: जय श्री राम! प्रसाद ओकने कुटुंबासह अयोध्येतील रामलल्लाचं घेतलं दर्शन, पत्नीने व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, पृथ्वीकच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटानंतर अभिनेत्याची दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये वर्णी लागली आहे. दिया मिर्झाची ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म भेटीस येत आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून यामध्ये बरेच मराठी कलाकार झळकणार आहेत. पृथ्वीक प्रतापसह अभिनेत्री सायली संजीव, सुहास शिरसाट पाहायला मिळणार आहेत. दिया मिर्झाची ही शॉर्ट फिल्म काय आहे? कधी प्रदर्शित होणार? आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात समोर येतील.