Priyadarshini Indalkar Environmental Thoughts : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. ‘पुण्याची विनम्र अभिनेत्री’ म्हणून ती अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. प्रियदर्शिनीने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सह ती काही सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनयासह ती अनेकदा समाजभान जपतानाही दिसते.
प्रियदर्शिनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रियदर्शिनी तिचे अनेक स्टायलिश फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तसंच ती पर्यावरण आणि निसर्गासंबंधित मतंही व्यक्त करीत असते. अशातच एका पॉडकास्टमध्ये तिनं समाजातील आणि देशातील निसर्ग आणि पर्यावरण संबंधित चुकीच्या गोष्टी बदलायला आवडतील हे सांगितलं आहे.
MHJ Unplugged या पॉडकास्टमध्ये तिला समाज आणि या देशातली कोणती गोष्ट बदलावीशी वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर देत प्रियदर्शिनी म्हणाली, “अशा खूप गोष्टी आहेत ज्या बदलायच्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कचरा करणाऱ्या माणसांना बुद्धी येवो आणि त्यांनी कचरा करू नये. कचऱ्याची शिस्त बदलावीशी वाटते.”
यानंतर प्रियदर्शिनी सांगते, “आपल्या देशात पर्यावरणाबाबतची जागरूकता शून्य आहे, ती गोष्ट बदलावीशी वाटते. तसंच प्लास्टिकच्या वापराबाबतही आपल्या देशात शून्य जागरूकता आहे, तर तेही बदलावंसं वाटतं.” देश आणि समाजामधील बदलाव्याश्या वाटणाऱ्या गोष्टींबरोबरच तिनं तिच्या आयुष्यातही बदलाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी सांगितल्या. याबद्दल प्रियदर्शिनी म्हणाली, “मला जास्त मोबाईल वापरण्याची सवय लागली आहे, ती बदलावीशी वाटते. मला फोनचा वापर कमी करायचा आहे.”
प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, प्रियदर्शिनीची मुख्य भूमिका असलेल्या ‘दशावतार’ या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सिनेमात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील तिची वंदू ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या सिनेमातही प्रियदर्शिनी निसर्ग जपणाऱ्या बाबुली मेस्त्रीला पाठिंबा देताना दिसत आहे.
‘दशावतार’ या सिनेमाबरोबरच प्रियदर्शिनी ‘फुलराणी’, ‘नवरदेव बीएससी अॅग्री’, ‘सोयरीक’ आणि ‘गाडी नंबर 1760’ या लोकप्रिय सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.