मराठी मालिकांच्या माध्यमातून अनेक नवनवीन चेहरे प्रेक्षकांसमोर येतात आणि अल्पावधीत ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग होऊन जातात. पण काही वर्षांपूर्वी मालिकांमध्ये काम करून नाव कमावलेल्या अनेक अभिनेत्री आज मनोरंजनसृष्टीपासून दूर राहत आपापल्या संसाराला लागल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीपासून दूर जाऊन परदेशात स्थायिक झालेली अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच नेहा गद्रे.
‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमुळे आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळी ओळख मिळाली होती. परंतु, सध्या ती अभिनयापासून दूर आहे. वैयक्तिक आयुष्यात २ मार्च २०१९ मध्ये तिने ईशान बापटशी विवाह केला. सध्या ते दोघेही ऑस्ट्रेलियात राहतात.
गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपसह फोटो शूट करत नेहाने आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली होती. याशिवाय तिने जेंडर रिव्हिल सुद्धा केलं होतं. काही महिन्यांपूर्वीच नेहा आई झाली असून तिच्या घरी गोंडस मुलाचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली होती.
नेहा गद्रेने तिच्या बाळाचं नाव इवान असं ठेवलं आहे. १० फेब्रुवारीला इवानचा जन्म झाला होता. यानंतर बरोबर ८ महिन्यांनी अभिनेत्रीने तिच्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला आहे.
“भेटा आमच्या चिमुकल्या बाळाला…हॅलो इवान. आज आमचं बाळ ८ महिन्यांचं झालं आहे…” असं कॅप्शन देत नेहाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेहाच्या चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींनी तिच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
मालिकाविश्व सोडल्यावर नेहा पतीसह ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. आता ती एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी नेहाने ऑस्ट्रेलियातून ‘डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ ही पदवी मिळवली. “जवळपास एक दशक मी अभिनेत्री म्हणून काम केलं. त्यानंतर वेगळ्या देशात येऊन नवीन कॅरिअर सुरू करणं ही सोपी गोष्ट नव्हती. माझ्यासाठी ही एक रोलर कोस्टर राईड आहे. परंतु मी जिथे पोहोचले त्याचा मला अभिमान आहे.” असं नेहाने तेव्हा तिच्या सर्व चाहत्यांना सांगितलं होतं.