Ajinkya Raut Answer Fan’s Question : आपल्या आवडत्या कलाकाराला सतत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मनोरंजन करताना पाहणं हे चाहत्यांना कायमच आवडत असतं. पण आपले आवडते कलाकार पडद्यावर फार दिवस दिसेनासे झाले की, या चाहत्यांकडून कलाकारांना सतत विचारणा होत असते. अशीच विचारणा एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याला चाहत्यांनी केली आहे.

लोकप्रिय मराठी अभिनेता अजिंक्य राऊतला चाहत्यांनी त्याच्या टीव्हीवरील कमबॅकबद्दल प्रश्न विचारला आहे. अभिनेता अजिंक्य राऊत सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. तसंच सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या चाहत्यांशी संवादही साधताना दिसतो.

‘विठू माउली’ या गाजलेल्या मालिकेतून अजिंक्यने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेत त्यानं विठू माऊलीची भूमिका साकारली होती. तसेच त्याने ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ मलिकेतही काम केले आहे. शिवाय त्याच्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यानंतर अभिनेता टेलीव्हिजनवर दिसला नाही. याबद्दल त्याला चाहत्याने प्रश्न विचारला आहे.

अजिंक्यनं नुकताच चाहत्यांशी संवाद साधला. इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे अजिंक्यला चाहत्यांनी काही प्रश्नं विचारली. त्यातील एका चाहत्याचा प्रश्न असा होता की, ‘तुला भविष्यात कोणती भूमिका करायला आवडेल? आणि तू आता परत टेलिव्हिजनवर काम करणार नाहीस का?’ यावर अजिंक्य असं म्हणाला, “मी यावर्षी तरी टेलीव्हिजनद्वारे कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्याचा काही विचार केला नाही.”

यानंतर त्यानं भविष्यातील भूमिकेबद्दल असं म्हटलं की, “मला एखाद्या राजपुत्राची, तरुण राजाची किंवा ज्याचं व्यक्तिमत्त्व अगदी विचारशील असेल, अशी एखादी भूमिका करायची इच्छा आहे”. दरम्यान, मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अजिंक्य ‘टकाटक’, ‘कन्नी’सारख्या सिनेमांत तो दिसला आहे.

अजिंक्य राऊत इन्स्टाग्राम स्टोरी
अजिंक्य राऊत इन्स्टाग्राम स्टोरी

अजिंक्य लवकरच ‘अभंग तुकाराम’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात अजिंक्य राऊतसह विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, निखील राऊत, तेजस बर्वे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हे कलाकारही असणार आहेत. दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.