Akshay Kelkar Wedding Haldi Ceremony : यंदाच्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. आता लवकरच छोट्या पडद्यावरील आणखी अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’मध्ये या अभिनेत्याने प्रमुख भूमिका साकारली होती. या अभिनेत्याचं नाव आहे अक्षय केळकर. अक्षयच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.
अक्षय आणि साधना यांचा मेहंदीसोहळा नुकताच पार पडला होता. आता दोघांनाही हळद लागली आहे. याशिवाय अभिनेत्याच्या घरी ग्रहमख विधी सुद्धा संपन्न झाला आहे. अक्षय आता लवकरच त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकरबरोबर लग्न करणार आहे. हे दोघेही जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
अक्षयच्या घरी हळदी समारंभाला दणक्यात सुरुवात झाली असून, मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार अक्षयच्या हळदीला पोहोचले आहेत. हळदी समारंभातील काही व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये प्रथमेश परब, समृद्धी केळकर यांसारखे लोकप्रिय कलाकार अक्षयच्या हळदीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.
अक्षय प्रेमाने त्याच्या होणाऱ्या बायकोला रमा म्हणतो. त्यामुळेच या लग्नसोहळ्यादरम्यान अभिनेत्याने ‘रमाक्षय’ हा हॅशटॅग क्रिएट केला आहे. अक्षय केळकरच्या लग्नाच्या फोटोंवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अक्षयने हातावर ‘रमाक्षय’ हे नाव मेहंदी समारंभात लिहून घेतलं आहे. तसेच, त्याच्या पत्नीने मेहंदी सोहळ्यात ‘अक्षयची नवरी’ असं नाव लिहिलेले कानातले घातले होते. आता अक्षय-साधना लग्नबंधनात केव्हा अडकणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अक्षय केळकरने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल करत होणाऱ्या बायकोची ओळख सर्वांना करून दिली होती. साधना काकटकर ही एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनाने तिचा आवाज दिला आहे. साधनाची ओळख सर्वांना करून दिल्यावर, काही दिवसांपूर्वीच या दोघांचं केळवण मित्रमंडळींनी थाटमाटात केलं होतं. आता अक्षय-साधना ही जोडी विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.