छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही कोणत्याही कलाकारासाठी भाग्याचीच गोष्ट… मराठीसह हिंदी सिनेविश्वात आजवर अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्या प्रत्येक भूमिका आजही अजरामर आहेत आणि प्रेक्षकांच्या तितक्याच आवडीच्या सुद्धा…
मराठीत अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, शरद केळकर, सुबोध भावे, गश्मीर महाजनी या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव सामील होणार होतं, हा अभिनेता म्हणजे ‘जय मल्हार’ फेम देवदत्त नागे. देवदत्तला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती.
देवदत्त नागेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण ही भूमिका करण्यासाठी त्यांनी प्रांजळपणे करणार नसल्याचं सांगितलं आणि याबद्दल त्यांनी स्वत:च एका मुलाखतीत खुलासा केला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत देवदत्तला ‘तू तुझ्या करिअरपासून कोणत्या भूमिकेची वाट बघत आहेस?’ असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नांचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, “मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी खूप विचारणा झाली होती. पण मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं की, मी राजे साकारू शकत नाही. कारण – छत्रपती शिवाजी महाराज हे खूप संतुलित व्यक्तीमत्त्व आहे आणि मी तसा नाही. त्यांची वागणूकही सौम्य आहे, म्हणजे काही म्हणतात ते सौम्य दिसायचेसुद्धा. पण रौद्ररूप होतं, ते छत्रपती संभाजी महाराजांचं. म्हणजे आता ‘छावा’ येऊन गेला म्हणून हे बोलत नाहीय. पण मध्यंतरी मी दाढी वगैरे वाढवली होती, तेव्हा अनेकजण छत्रपती संभाजी राजे म्हणायचे. पण आता अनेक सिनेमे येऊ घातलेत. त्यामुळे हरकत नाही. मी त्यांच्यात मला बघतो.”
दरम्यान, देवदत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्येही मुख्य भूमिका केल्या. याशिवाय त्याने ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. काही दिवसांपुर्वी तो स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवर ‘उदे गं अंबे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.