Sankarshan Karhade Shares Childhood Memories : प्रत्येकाचं बालपण हे निरागस असतं. त्या बालवयात आपल्या प्रत्येकाच्या मनात फक्त आणि फक्त प्रेम असतं. त्या वयात आपल्याला ना कोणत्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो, ना कोणत्या जातीबद्दल… त्या वयात आपल्यासाठी सगळेच समान असतात. आपल्यापैकी अनेकांनी आपापल्या बालपणी अनेक जाती आणि धर्मांतील मुलांबरोबर हमखास मैत्री केली असेल. आपल्यापैकी कोणाचे ना कोणाचे तरी मुस्लीम मित्र असतीलच.
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचेसुद्धा असे अनेक मुस्लीम मित्र होते. ज्यांच्याबरोबर त्याचं बालपण गेलं आहे. त्यापैकी एका मुस्लीम मुलानं तर संकर्षणचा जीव वाचवला होता आणि याबद्दल स्वत: संकर्षणनं खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संकर्षणनं त्याच्या बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत संकर्षणनं त्याच्या घरातील मुस्लीम कुटुंबाबद्दलची आठवणही शेअर केली.
याबद्दल संकर्षण म्हणतो, “मी खूप मुस्लीम मित्रांबरोबर वाढलो आहे. मला आता हे हिंद-मुस्लीम राडे होतात किंवा कधी त्यावरून वादळ उठतं; तेव्हा वाईट वाटतं. बिस्मिला भाभी म्हणून आमच्याकडे मदतनीस होत्या. त्यांचं वय माझ्या आईपेक्षा थोडं जास्त असेल. बिस्मिलाभाभींनी पाच मुलांसह आम्हा तिन्ही भावंडांना त्यांच्या पदराखाली घेऊन झोपवलं आहे. आता मला फार असं वाटतं की, लहाणपणी आम्हाला हे हिंदू-मुस्लीम असं माहीत नव्हतं.”
त्यानंतर तो म्हणतो, “अफसर, परवीन, हुमेरा, शबाना, कलिमा व इरफान अशी सहा मुलं त्यांना होती, त्यातल्या अफसरनं मला लहानपणी मरता मरता वाचवलं आहे. तेव्हा अफसर सात-आठ वर्षांचा होता. आमचं घर दोन मजली होतं आणि त्याला वरच्या मजल्याला बाजूनं संरक्षक भिंत नव्हती. नुसतेच गज लावलेले होते. तेव्हा मी दोन-तीन वर्षांचा होतो आणि नुकताच चालायला लागलो होतो. तेव्हा मी वरून पडलो; तर त्या अफसरनं मला खाली झेललं आणि आईकडे आणून दिलं.”
संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे तो म्हणाला, “आमच्याकडे कुळधर्म-कुळाचार होतो. हिंदू असल्यामुळे देव-देवी, माळा आणि हार-दूर्वा वगैरे सगळं आहे. तांब्याची भांडीही घरात असतात; तर ती भांडी धुणारी आमची बिस्मिलाभाभी होती. मुद्दा असा आहे की, आता आजूबाजूला सगळं पाहून विचार येतो की, आमचं बालपण तर यांच्याबरोबरच गेलं आहे. माझे खूप मुस्लीम मित्र आहेत. मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचो. मी त्यांची भाषा शिकलो. त्यांच्या शिव्या शिकलो.”
पुढे त्यानं सांगितलं, “आमच्याकडे महालक्ष्मीच्या पूजेसाठी १६ भाज्या, सहा चटण्या, तीन कोशिंबिरी, पापड, बुंदीचा लाडू असं सगळं असतं. तर, पूजेच्या दिवशी आमच्यापेक्षाही शिस्तीत त्या बिस्मिल्लाभाभीच्या हुमेरा, अफसर, शबाना, कलिमा व इरफान यांना आम्ही नैवेद्याचं जेवण जेवताना पाहिलं आहे. त्या माझ्या आईला बंमनभाभी हाक मारायच्या. तेव्हा तो जातीद्वेष वाटतं नव्हता. त्या माझ्या आईच्या जेवणाचं कौतुक करायच्या. ते फार भारी होतं. आमचं एकच कुटुंब होतं.”