Marathi Actor Post On Thane Ghodbandar Road Traffic : मुंबई शहर आणि या शहरातली वाहतूक कोंडी आता काही नवीन राहिलेली नाही. मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक मुंबईकर त्रस्त आहे.
वाहतूक कोंडीमुळे कायमच चर्चेत असलेला रोड म्हणजे ठाणे-घोडबंदर रोड. खड्ड्यांमुळे ठाणे-घोडबंदर रोडवर कोणत्याही वेळी वाहतूक कोंडी ही असतेच. या वाहतूक कोंडीचा त्रास अनेक नागरिकांना सहन करावा लागतो. तसंच या रोडवरील खड्ड्यांमुळेही नागरिक त्रस्त आहेत.
ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा त्रास केवळ सामान्य नागरिकच नव्हे; तर अनेक कलाकारांनासुद्धा होत आहे आणि या त्रासाबद्दल कलाकार मंडळी त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करतात. ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांबाबत आणि वाहतूक कोंडीबद्दल आस्ताद काळे, जुई गडकरी, सुरभी भावे, मिलिंद फाटक यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
नुकतंच अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही व्हिडीओ शेअर करीत अत्यंत सुंदर रस्ता अशी खोचक पोस्टही शेअर केली होती. तसंच या व्हिडीओ मध्ये तिने प्रताप सरनाईक यांनाही टॅग केलं होतं. अशातच मराठी अभिनेत्यानेही या रस्त्याबद्दल टोला लगावला आहे.
मराठी अभिनेता श्रेयस राजेने ठाणे-घोडबंदर रोडबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता असं म्हणतो, “ठाण्यातून बोरिवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. खूप वाहतूक कोंडी आहे. एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहोचाल.” यासह श्रेयसने ट्रॅफिक, घोडबंदर रोड आणि ठाणे असे हॅशटॅगही लिहिले आहेत.

दरम्यान, अनेक मालिका व सिनेमांमधून श्रेयसने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर द्वारे तो त्याच्या काव्यात्मक पोस्ट शेअर करीत असतो. अशातच त्याने ठाणे-घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या उपरोधिकपणे व्यक्त केली आहे.