‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदीत सुव्रतने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या सुव्रतचं ‘वरवरचे वधू-वर’ नाटक सुरू आहे. या नाटकात पत्नी, अभिनेत्री सखी गोखलेबरोबर तो पाहायला मिळत आहे. विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच नाटकाच्या प्रयोगसाठी जात असताना सुव्रतला कॅबमध्ये एक वेगळाच अनुभव आला. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेता सुव्रत जोशीने कॅब चालकाचा फोटो शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे. त्याने लिहिलं आहे, “काल ( १४ सप्टेंबर ) ‘वरवरचे वधू-वर’ या आमच्या नाटकाचा श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग होता. गणेशोत्सवामुळे दादर भागात गर्दी असणार हे अपेक्षित होतं म्हणून कॅबने जायचा विचार केला. उबेरला हे फोटोत दिसणारे सचिन भाऊ चालक म्हणून आले. त्यांनी बसल्या बसल्या माझ्याकडे बघून स्तिमित झाले आणि एक छान छान सुहास्य देऊन ओटीपी विचारला. मग काही वेळाने सभ्यपणे त्यांनी मला ओळखल्याचे आणि त्यांना माझे काम आवडत असल्याचं सांगितलं. पण मग लगेचच त्यांनी तुमचं नवं नाटक ‘वरवरचे वधू-वर’ पाहायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली. हे ऐकून मात्र मी हरखून गेलो.”
“नाटकाचा शुभारंभ झाल्यापासून ते आणि त्यांची पत्नी नाटकाला येण्यासाठी सोयीस्कर दिवस शोधत आहेत. दोघेही काम करतात आणि त्यांची कन्या अगदी लहान असल्यानं अजून जमलं नाही. मग मात्र मी त्यांना आग्रह धरला की चला आताच प्रयोगाला बसा. त्यांच्या पत्नीला त्यांनी व्हिडीओ कॉल लावला. साधेसे घर आणि निगुतीने सजवलेला बाप्पा पार्श्वभूमीवर होतं. मी त्यांनाही आमंत्रण केलं. पण घरी बाप्पा आणि मुलगी असल्यानं आज जमत नसल्याचं वहिणींनी सांगितलं. त्यांच्या घरातील बाप्पाचं आणि चिमुकलीचं दर्शनही व्हिडीओ कॉलवर झालं.”
हेही वाचा – Video: “तुझा एवढ्या दिवसांचा स्ट्राँग प्रवास पाहून…”, पंढरीनाथ कांबळेच्या मुलीने दिला धीर, म्हणाली…
पुढे सुव्रतने जोशी लिहिलं आहे, “सचिन भाऊ तुम्ही तुमच्या सोयीने प्रयोगाला यालच, पण हा प्रसंग मला कलाकार म्हणून खूप काही देऊन गेला. मराठी नाटक हे प्रत्येक व्यवसायातील, विविध पार्श्वभूमी असलेल्या मराठी माणसाला पहावेसे वाटते ही फार दुर्मिळ आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मध्यंतरी आमच्या एका प्रयोगाला एका फार मोठ्या पदावरचे सचिव गुपचूप तिकिट काढून नाटक बघून गेले आणि आता सचिन भाऊ पण येतील. मी जगभर नाटकाचे प्रयोग पाहिले. मी हिंदी नाटकाचे प्रयोग पृथ्वी थिएटर, NCPA आणि भारतभर केले. पण विशिष्ट कलाव्यवहार हा विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित राहतो असाच माझा अनुभव.”
“फक्त शेक्सपियर काळात कष्टकरी ते जमीनदार globe थिएटरमध्ये नाटक बघायला एकत्र यायचे. मराठी नाटक हे त्या कुळातील पण त्याचेच जिवंत, प्रवाही प्रारूप आहे की काय असं वाटून गेलं. अर्थात याचं संपूर्ण श्रेय इथे होऊन गेलेल्या आमच्या दिग्गजांना आहे. आणि आताही भरत जाधव सर, प्रशांत दामले सर तर प्रायोगिक रंगभूमीवर अतुल पेठे यांसारख्या अनुभवी कलाकारांना आहे. त्यांचे नाटक हे भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्तर चिरून जायचा प्रयत्न सतत करत असतं. यातून जबाबदारीची जाणीव खूप वाढली. प्रत्येक माणूस नाटक बघायला येतो तेव्हा तो त्याच्या कष्टाची कमाई आपल्या प्रति खर्च करत असतो. त्यामुळे आपलं सगळं बाजूला सारून त्याला एक उत्तम प्रयोग नाही देऊ शकलो तर तो नैतिक अपराध असेल असंच वाटून गेलं,” असं सुव्रत जोशी म्हणाला.
“नाट्यशास्त्र म्हणते की नाटक हे डोळे आणि कानांनी करायचा यज्ञ आहे. मी पुढे जाऊन म्हणेन की आम्ही नटांनी तर सर्व इंद्रिये या आहुतीमध्ये ओतली पाहिजेत. आमचे पडद्यामागचे कलाकार त्यांच्या घामाचे धृत यात टाकतात. तसंच प्रेक्षकही यात आपल्या वेळेचे, मनाचे, इंद्रियांचे अर्घ्य देत असतो. यातून पेटलेला हा नाट्ययज्ञ हा हिवाळी रात्री पेटवलेल्या शेकोटीप्रमाणे सर्व रसिकांना ऊब देत राहो अशी सदिच्छा,” अशी सुंदर पोस्ट सुव्रत जोशीने लिहिली आहे.