ऐश्वर्या नारकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे व्हिडीओ व फोटो त्या शेअर करताना दिसतात. एवढेच नाही, तर पती अविनाश नारकर यांच्याबरोबर त्या नेहमीच रील शेअर करीत असतात.
ऐश्वर्या आपल्या फिटनेसची मोठ्या प्रमाणात काळजी घेतात. अनेकदा त्या व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतात. या व्हिडीओला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. वयाच्या पन्नाशीतही ऐश्वर्या खूप फिट दिसतात. अनेकांना त्यांच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेण्यात रस असतो. अशातच ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी फिट राहण्यासाठी त्या कोणता आहार घेतात याबाबतचा खुलासा केला आहे.
सध्या ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या जंगलात बसून जेवताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांनी डब्यात आणलेल्या खास पदार्थांची झलक दाखविली आहे. ऐश्वर्या यांनी, डब्यात वांग्याचे भरीत, नाचणीची भाकरी, मटकीची उसळ, कोशिंबीर,असे पदार्थ आणलेले दिसत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी “तंदुरुस्त राहा, निरोगी राहा” अशी कॅप्शनही दिली आहे. ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत त्यांच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली आहे.