छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यापैकी एक म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. रसिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर रसिका मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते.
रसिकाने २०१८ साली दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदेबरोबर लग्नगाठ बांधली. नुकतीच त्यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनिरुद्धने रसिकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर रसिकाबरोबरचे फोटो पोस्ट करीत बायकोला खास पद्धतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनिरुद्धने पोस्टमधये लिहिले, “माऊ, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारात तू कायम माझ्याबरोबर असतेस. अशीच माझ्याबरोबर आयुष्यभर राहा. माझ्याकडून घडलेल्या चुका तू नेहमी समजून घेतेस आणि मला योग्य तो मार्ग दाखवतेस. माणूस कधीच एकटा यशस्वी होत नाही. त्याच्याबरोबर असणारी माणसं, पाठीशी असलेली त्याची साथ यामुळे त्याला बळ मिळतं आणि मी यशस्वी होण्यामध्ये तुझा मोलाचा वाटा आहे. तुलाही आयुष्यात मोठं होताना बघून खूप आनंद होत आहे. खूप कौतुक वाटतं तुझं.”
पुढे त्याने लिहिले, “तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमी तुझ्यासोबत कायम आहे. दोघांनी मिळून अशीच मेहनत करूया. कारण- आपला प्रवास खूप दूरचा आहे आणि या प्रवासात तुझा हा सहप्रवासी नेहमी तुझ्यासोबत आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माऊ.” अनिरुद्धची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रसिकानेही या पोस्टवर कमेंट्स करीत “आय लव्ह यू माऊ”, असे म्हटले आहे.
हेही वाचा- लग्नानंतर शिवानी व अजिंक्य पोहोचले हनिमूनला; रोमँटिक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “माझ्या बायकोची…”
रसिका व अनिरुद्धची पहिली ओळख महाविद्यालयात झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फ्रेशर्स’ मालिकेत काम केले आहे. तर, अनिरुद्ध एक प्रसिद्ध दिग्दर्शक असून, त्याने ‘फ्रेशर्स’, ‘का रे दुरावा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे