Marathi Actress : हिंदी असो किंवा मराठी… मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा कलाकारांकडे काम नसतं, तर कधी जास्त मानधन आकारल्यास लगेच त्यांना रिप्लेस केलं जातं. याशिवाय काही कलाकारांना तर लूक टेस्ट, मॉक शो झाल्यावर अचानक मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
मराठी कलाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीला काही वर्षांपूर्वी असा अनुभव आला होता. मधल्या काळात काम नसल्याने ती इंडस्ट्रीपासून दूर होती. मात्र, आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे.
‘मेंदीच्या पानावर’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘लव्ह लग्न लोचा’ अशा मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच अक्षया गुरव. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. तिच्या सहज व सुंदर अभिनयाचे हजारो चाहते आहेत. ‘आई कुठे काय करते’ या गाजलेल्या मालिकेत सुद्धा झळकली आहे. मात्र, मध्यंतरीची काही वर्षे ती कलाविश्वापासून दूर होती.
आता अक्षया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती ‘सन मराठी’च्या ‘आदिशक्ती’ मालिकेत झळकणार आहे. ८ मे रोजी प्रसारित होणाऱ्या भागात अक्षयाची मालिकेत ग्लॅमरस एन्ट्री होणार आहे. ‘आदिशक्ती’ ही मालिका ‘सन मराठी’वर रोज रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते.
दरम्यान, इंडस्ट्रीपासून दूर का होती? याबद्दल अक्षया गुरव म्हणाली होती, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक संघर्षाचा किंवा वाईट काळ येतो. तसाच माझ्याही आयुष्यात आला होता. माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. ऑपरेशन झाल्याने तो जवळपास ५ ते ६ महिने घरी होता आणि त्या काळात माझ्याकडे काही कामच नव्हतं.”
“‘प्लीज काम द्या’ म्हणत त्या दिवसांमध्ये मी कोणतीही भूमिका करण्यासाठी तयार होते. कारण, प्रत्येक कलाकारासाठी काम खूप महत्त्वाचं असतं. त्या मधल्या काळात मला एका शोसाठी ऑफर आली होती. मोठं चॅनेल आहे त्यामुळे मी नाव घेणार नाही. त्यांनी मला फायनल केलं, लूक टेस्ट, मॉक शो झाले, संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि अचानक आदल्या रात्री मला फोन करून सांगितलं तुझ्याबरोबर आम्ही काम करणार नाही. आम्ही त्या पात्रासाठी दुसरी अभिनेत्री कास्ट केली आहे.” असा अनुभव अक्षयाने ‘हंच मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.