Marathi Actress Navratri Post : देशभरात शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करून, देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याशिवाय या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियांचंही आयोजन केलं जात असतं.
नवरात्रीनिमित्त सगळीकडेच स्त्रीशक्तीच्या जागराचे वातावरण असून, अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जात आहे. तसंच अनेक कलाकार मंडळीसुद्धा सोशल मीडियाद्वारे या नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांबद्दल आदर व्यक्त करीत आहेत.
अनेक मराठी अभिनेत्रीही आपापल्या संकल्पनेद्वारे कला, विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान आणि अशा अनेक क्षेत्रांत मोलाचं कार्य करणाऱ्या स्त्रियांना आपापल्या परीनं मानवंदना देत आहेत. नवरात्रीनिमित्त त्यांच्या महान कार्याची आठवण केली जात आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिनं सोशल मीडियावर नवरात्रीनिमित्त पुरुषांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून तिनं पुरुषांकडून स्त्रियांना होणाऱ्या त्रास आणि जाचाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये अपूर्वा म्हणते, “Dear Men, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला मान देऊ शकत नसाल, तिला भावनिक त्रास देत असाल, तर कृपया नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊ नका. आम्ही आमच्या आयुष्यातल्या स्त्रियांना कसं सेलिब्रेट करतोय, याचं खोटं नाट्य उभं करू नका.” अपूर्वानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे.
अपूर्वा गोरे ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती आपले विविध लुक्समधील फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. विविध लूकमधील फोटोंवर चाहतेसुद्धा आपल्या विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा चाहत्यांशी संवाद साधताना दिसते.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून अपूर्वानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेत तिनं ईशा ही भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, तरी या मालिकेतील सर्वांची लाडकी अशी ईशा प्रेक्षकांच्याही मनात आजही घर करून राहिली आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर अपूर्वाला नव्या भूमिकेत पाहण्याची इच्छा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अपूर्वा कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, याची तिची चाहते मंडळी आतुरतेनं वाट बघत आहेत.