Madhavi Nimkar : मराठी मनोरंजनसृष्टीतील बरेच कलाकार मूळचे कोकणातले आहेत. निखिल बने, तितीक्षा तावडे, अंशुमन विचारे, प्रसाद खांडेकर यांसह बरेच कलाकार व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून वर्षातून एकदा तरी कोकणात आपल्या गावी जातात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच गौरी-गणपतीच्या सणाला मुंबईकर कोकणवासी गावची वाट धरतात. अलीकडेच हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरीत फिरायला गेल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने कोकण ट्रिपची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली खलनायिका शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर नुकतीच कोकणात तिच्या आजोळी गेली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या आजोळी गुहागरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

माधवी दरवर्षी गुहागर फिरायला जाते. विशेष म्हणजे तिच्या घराच्या मागे सुंदर अशी नारळ-सुपारीची बाग आहे आणि तिथून हाकेच्या अंतरावर समुद्रकिनारा आहे. घराच्या आजूबाजूला हे असं वातावरण असेल तर आणखी काय हवं? कोकण म्हणजे सुख आहे असं सांगत माधवीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माधवी म्हणते, “मी आता गुहागरमध्ये आहे…आमच्या गावच्या वाडीतून चालतेय… आता समुद्राच्या दिशेने आम्ही जातोय. कोकणात स्वत:चं घर असणं…इथे येऊन राहणं, आपल्या कुटुंबीयांसह एन्जॉय करणं यासारखं दुसरं सुख नाही. मी दरवर्षी गुहागरला येते आणि खूप मजा करते. इथे आल्यावर आयुष्यातील प्रत्येक क्षण खूप छान जातो. आता आम्ही समुद्रावर जाऊन सूर्यास्त पाहणार आहोत…असं सुख अजून कुठे मिळणार”

माधवीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “कोकण म्हणजे सुख…त्यात गुहागर म्हणजे सुकून”, “वाह मस्त एन्जॉय करा”, “हेच खरं सुख आहे…गुहागर मस्तच जागा आहे”, “आमचं कोकण स्वर्ग आहे” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, माधवी निमकरने आजवर ‘स्वप्नांच्या पलीकडे’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय माधवी ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ यांसारख्या सिनेमांमध्येही झळकली आहे.