Ashok MaMa Marathi Serial : ‘अशोक मा.मा.’ ही लोकप्रिय मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू झाली होती. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री रसिका वाखारकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय या मालिकेच्या निमित्ताने शुभवी गुप्तेने मालिकाविश्वात पदार्पण केलं. शुभवी ही लोकेश व चैत्राली गुप्ते यांची मुलगी आहे.

‘अशोक मा.मा.’ मालिकेत शुभवी गुप्तेने अशोक सराफ यांच्या मोठ्या नातीची म्हणजेच संयमीची भूमिका साकारली होती. तिने नुकतीच या मालिकेतून एक्झिट घेतली. मालिकेचा निरोप घेतल्यावर शुभवीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. तसेच अशोक सराफ यांचे आभार मानले आहेत.

शुभवी गुप्तेची पोस्ट

मामा,
मी तुमच्याबद्दल काय बोलू? कारण, तुमच्याबरोबर स्क्रीनवर काम करणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर अनुभव होता. इंडस्ट्रीमधील प्रत्येकजण तुम्हाला Legend म्हणतो. तुम्ही सर्वांसाठीच ‘आदर्श’ आहात. तुम्ही संपूर्ण पिढीचं निखळ मनोरंजन केलंत…मराठी सिनेमाला एक वेगळा आकार दिलात. या मालिकेच्या निमित्ताने मला तुम्हाला फार जवळून ओळखता आलं. सेटवरची अशी व्यक्ती जी सर्वांना आपलीशी वाटते, प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवते आणि कायम सर्वांना आनंद देते. समोरच्या व्यक्तीला इतक्या प्रेमाने एखादी गोष्ट शिकवायची की, त्याला कधीच कमीपणा वाटू नये…ज्यामुळे निश्चितच माझ्यात खूप सुधारणा झाली. भविष्यात मी सुद्धा खूप मोठं व्हावं या नात्याने तुम्ही माझी खूप काळजी घेतलीत, मला अनेक गोष्टी शिकवलात. मी जेव्हा अडखळले तेव्हा मला प्रोत्साहन दिलंत. मला कायम मार्गदर्शन केलंत. तुमच्यातील सौम्यपणा, दुसऱ्याप्रतीचा आदर या सगळ्या गोष्टी कायम माझ्या लक्षात राहील. मी तुमच्याकडून खूप काही शिकले. सीन, संवाद यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. मात्र, एक उत्तम कलाकार असताना एक चांगला माणूस कसं व्हायचं हे देखील तुम्ही शिकवलंत आणि हा धडा मी कायमस्वरुपी लक्षात ठेवेन.

थँक्यू,
सुंदर हास्यमय क्षणांसाठी
सुंदर कथेसाठी
तुम्ही केलेल्या मार्गदर्शनासाठी
तुम्ही इतक्या सहजतेने दिलेल्या प्रेमासाठी….

कदाचित हा शेवटचा सीन आहे
पण, तुमचा आदर्श सदैव माझ्याबरोबर आहे.

दरम्यान, ‘अशोक मा.मा.’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच या सिरियलमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ एन्ट्री घेतील. यानिमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदाच अशोक व निवेदिता सराफ यांची जोडी मालिकाविश्वात एकत्र पाहायला मिळेल.