Marathi Actress Vallari Viraj Dance Video : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री वल्लरी विराज घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत प्रेक्षकांना एजे आणि लीलाची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांच्या मनावर वर्षभर अधिराज्य गाजवल्यावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने मे महिन्यात सर्वांचा निरोप घेतला. मात्र, वल्लरीने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे.
वल्लरी विराज उत्तम अभिनेत्री आहेच पण, त्याचबरोबरीने ती नृत्यांगना म्हणून देखील ओळखली जाते. मालिका संपल्यावर वल्लरीचे डान्स व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. वल्लरी आणि आलापिनी या दोघी अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर सुंदर डान्स सादर करतात आणि सर्व चाहत्यांकडून कौतुकाची थाप मिळवतात.
मात्र, या व्हिडीओमध्ये वल्लरीने सोलो परफॉर्म केलं आहे. तिने नुकताच शेअर केलेला डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. यामध्ये अभिनेत्रीने बॉलीवूडच्या ‘छाव लागा’ या रोमँटिक गाण्यावर सादरीकरण केलं आहे. या गाण्यातील वल्लरीच्या कमाल एक्स्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा व्हिडीओच्या कमेंट्समध्ये वल्लरीचं भरभरून कौतुक केलं आहे.
‘छाव लागा’ हे गाणं वरुण धवन आणि अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेल्या ‘सुई धागा’ सिनेमातील आहे. २०१८ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामधील ‘छाव लागा’ हे मूळ गाणं पॅपोन आणि रोंकिनी गुप्ता यांनी गायलं आहे. याच गाण्यावर आता मराठमोळी अभिनेत्री वल्लरी विराज थिरकली आहे. ‘छाव लागा’ या गाण्यातील प्रत्येक ओळीनुसार अभिनेत्रीने कमाल एक्स्प्रेशन्स देऊन हे सादरीकरण केलं आहे.
वल्लरी विराजच्या पोस्टवर अक्षया हिंदळकर, आशुतोष गोखले या कलाकारांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. तर, तिच्या अन्य काही चाहत्यांनी सुद्धा “वल्लरी कमाल एक्स्प्रेशन्स”, “किती सुंदर डान्स करतेस”, “याला म्हणतात खरे एक्स्प्रेशन्स” अशा प्रतिक्रिया व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या यशानंतर आता वल्लरी कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.