संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी’ या गाण्यांनी जगभरात धुमाकूळ घातल्यावर सध्या या प्रसिद्ध गायकाचं ‘सुंदरी-सुंदरी तुझं नाव काय हाय…’ हे गाणं सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे. गेल्या काही दिवसांत मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी ‘सुंदरी’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण संजूच्या गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवत आहेत.

मराठी मालिकाविश्वातील जुळ्या बहिणींच्या जोडीने देखील नुकताच ‘सुंदरी’ गाण्यावरील खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या दोघीही एकाच मालिकेत काम करतात. ‘सुंदरी’ या गाण्यावर डान्स करताना दोघींनी लाल रंगाचा व सेम डिझाइन असलेला ड्रेस घातल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नव्हे तर व्हिडीओमध्ये या जुळ्या बहिणींच्या केसांची हेअरस्टाइल सुद्धा सेम टू सेम आहे.

या अभिनेत्रींची नावं आहे नेहा व निकिता. या दोघीही ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत पुष्मा मामी ही भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री विद्या सावळे यांच्या या मुली आहेत.

विद्या यांनी आजवर ‘जीव झाला येडापिसा’, ‘राजा राणीची गं जोडी’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या विद्या यांच्या मुली नेहा आणि निकिता या ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये सवी व कवी या भूमिका साकारत आहेत.

दरम्यान, यापैकी नेहाने यापूर्वी ‘कलर्स मराठी’च्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत काम केलं होतं. ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही मालिका आधी ‘कॉन्स्टेबल मंजू’ म्हणून ओळखली जायची. सध्या या मालिकेचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ही मालिका रात्री ८ वाजता ‘सन मराठी’वर प्रसारित केली जाते.

नेहा आणि निकिता यांच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप सुंदर डान्स”, “अरे सवी कोण-कवी कोण? ओळखूच येत नाहीये”, “जमलंय बरं का”, “परफेक्ट जोडी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.