Salman Khan Comedian Praise Pranit More : ‘बिग बॉस १९’मध्ये कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले आहेत. यात मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेही सहभागी झाला आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्या दिवसापासूनच प्रणीत त्याच्या दमदार खेळानं प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार मंडळीसुद्धा त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.

प्रणीत मोरे त्याच्या स्टँडअप कॉमेडीसाठी लोकप्रिय आहे. आपल्या स्टँडअप शोमध्ये तो सर्वांवर विनोद करतो, तसंच विनोदाच्या माध्यमातून अनेक कोपरखळ्याही देतो, विनोदाच्या मध्यमातून टीकात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत असतो. अशातच नुकत्याच झालेल्या भागात त्यानं ‘बिग बॉस’च्या घरी स्टँडअपचा शो केला.

यावेळी त्यानं घरातील सगळ्यांवर टीकात्मक विनोद केले, ज्यावर प्रेक्षकांनीही त्याला हसून दाद दिली. इतकंच नव्हे तर स्वत: सलमाननंदेखील त्याच्या या विनोदीशैलीचं कौतुक केलं. शोमधील स्टँडअपमध्ये त्याने सर्वात आधी कुनिका सदानंद यांच्यावर विनोद केले. ‘कुनिकाजी या घरात सगळ्यांचा विचार करतात. कुनिका खूप प्रेमळ आहेत’ असं म्हटलं. तसंच त्यानं कुनिका यांच्यावर ‘सुरसूरी’वरूनही खोचक टीका केली. त्याच्या या विनोदावर सगळेच जण जोरजोरात हसले.

पुढे त्यानं आपला मोर्चा वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चहरकडे वळवला. तिच्याबद्दल विनोद करताना त्यानं म्हटलं, “काही लोकांना मालती आवडत नाही, पण मला ती आवडते. कारण ती खूप चांगली मुलगी आहे. शोमध्ये येताच सगळ्यांनी तिला विचारलं की, ‘आमचा खेळ कसा आहे?’ पण या सगळ्यांना तिनं फक्त ‘सांगणार’ असं उत्तर दिलं. एक आठवडा होऊनही तिनं कोणालाच काहीच सांगितलं नाही.” पुढे त्याने मालतीच्या काम न करण्याबद्दलही टोमणा मारला.

यानंतर प्रणीतने अमालच्या शिव्या देण्याबद्दल त्याच्यावर निशाणा साधला. टास्कदरम्यान, मालतीनं फरहानला चुकून शिवी दिली होती. याबद्दल त्यानं टोमणा देत असं म्हटलं, “अमालने मालतीला ‘शिवी नको देऊ’ असं म्हणणं म्हणजे जणू विरोधाभासच आहे.”

यानंतर प्रणीत ‘बिग बॉस’च्या खेळामधला त्याचा शत्रू बसीरकडे वळला. त्यानं बसीरबद्दल असं म्हटलं की, “तो आला तेव्हापासून आक्रमक होता. फक्त मारामारी, वाद करायचा. पण, आता बसीर शहाण्या मुलासारखा वागत आहे. तो आता फक्त किचनमध्येच दिसतो.”

पुढे प्रणीतनं आपला मोर्चा तान्याकडे वळवला. यावेळी तो तान्याला म्हणाला, ‘तू मला सांग, गेल्या ४५ दिवसांत तू किती वेळा खोटं बोलली आहेस?’ यावर तान्या उत्तर देते की, ‘शून्य वेळा.’ यावर प्रणीत म्हणतो, ‘तू पुन्हा आता खोटं बोललीस.’ यानंतर सगळे जण जोरजोरात हसायला लागले.

प्रणीत मोरे स्टँडअप व्हिडीओ

प्रणीतच्या या स्टँडअप शोनंतर होस्ट सलमान खाननं त्याचं कौतुक केलं. याबद्दल सलमान म्हणाला, “मला आवडलं की प्रणीतने या घरातही त्याचं स्टँडअपचं दुकान सुरू केलं आहे. प्रणीत, खूप छान!” दरम्यान, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओलासुद्धा अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिता वलावलकर, मेघा धाडे, अभिजीत केळकरसह अनेक सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सनी त्याच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.