Mayuri Wagh : विविध मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच मयुरी वाघ. ‘अस्मिता’ या मालिकेमुळे तिला एक नवीन ओळख मिळाली. याच मालिकेच्या सेटवर मयुरी आणि पियुष रानडे यांची ओळख व मैत्री झाली होती. काही महिन्यांनी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण, यांचा संसार फार काळ टिकला नाही. मयुरी आणि पियुषचा लग्नाच्या वर्षभरानंतर घटस्फोट झाला.

मयुरीला या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागला. आज अनेक वर्षांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून मयुरीने आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे. सेपरेशनच्या काळात वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले… लग्नानंतर काही महिन्यांतच माझा निर्णय चुकला हे माझ्या आई-वडिलांना समजलं होतं. पण, माझं मन सगळं स्वीकारायला तयार नव्हतं असं मयुरीने सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

“दुसऱ्या लग्नाचा किंवा जोडीदाराचा विचार केला का? किंवा आयुष्यात पुढे गेलं पाहिजे असं वाटलं का?” असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला होता. यावर मयुरी म्हणाली, “आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवणं जड जात होतं. हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय हे मला पचतच नव्हतं. एखादी व्यक्ती माझ्यावर हात उचलतेय हे कसं काय घडू शकतं..असं काही होऊच शकत नाही या भावनेत मी होते. प्रत्येक गोष्ट स्वीकारायला मला खूप वेळ गेला. मी कायदेशीर गोष्टी सुद्धा करू शकत होते पण काहीच केलं नाही. कारण, मी सतत दडपणाखाली होते. आता कोणत्या गोष्टीवरून वाद होईल, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल याचा काहीच अंदाज नव्हता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी खूप संघर्ष केला. यामुळे पुढचे काही महिने मी स्वत:ला सगळ्यापासून दूर ठेवलं होतं.”

“आता मयुरी वाघसाठी प्रेमाची व्याख्या काय आहे?” यावर अभिनेत्री एका शब्दात उत्तर दिलं ‘आदर’. मयुरी म्हणाली, “रिलेशनशिपमध्ये आदर आणि विश्वास या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रेम वगैरे सगळं ठिक आहे पण, चारचौघांत समोरच्या व्यक्तीचा आदर करणं महत्त्वाचं असतं.”

भविष्यात कोणावरही लगेच विश्वास ठेवणं कठीण जातंय असं मयुरीने यावेळी भावनिक होत सांगितलं. दरम्यान, ‘अस्मिता’ या गाजलेल्या मालिकेनंतर मयुरीने काही मालिकांमध्ये काम केलं. यानंतर लॉकडाऊनचा काळ सुरू झाला होता. त्यानंतर ती छोट्या पडद्यापासून दूर होती. अलीकडेच ‘अबोली’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना मयुरी दिसली होती.