Mi Savitribai Jotirao Phule New Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नेहमीच विविध विषयांवरील कलाकृती सादर केल्या जातात. याआधी ‘राजा शिवछत्रपती’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवला गेला आहे. आता लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी मिळून केलेल्या संघर्षामुळे मुलींना शिक्षण घेता आलं, सज्ञान होता आलं. अत्यंत बिकट परिस्थितीत, प्रसंगी घरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष पत्करून त्यांनी सामाजिक कार्य केलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत या हेतूने ‘स्टार प्रवाह’ वाहिनी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही नवीन मालिका सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या मालिकेत सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत दिसतील. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.

मधुराणी गोखले आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते, “सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अशा संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.”

दरम्यान, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही नवीन मालिका नवीन वर्षात ५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मधुराणी व डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार? ही मालिका किती वाजता प्रसारित केली जाणार याबाबत स्टार प्रवाह वाहिनी लवकरच अधिकृत घोषणा करेल.