काही मालिका लोकप्रियतेचे शिखर गाठताना दिसतात. काही मालिका त्यातील पात्रे, कथानक, कलाकारांचा अभिनय यांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर स्वत:चा ठसा उमटवतात. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, कांचनआजी, आप्पा, अभिषेक, ईशा, संजना, गौरी, यश अशा सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. काही दिवसांपूर्वीच ही मालिका बंद होणार असल्याचे समोर आले आहे. आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पात्राविषयी वक्तव्य केले आहे.

मिलिंद गवळी अनिरुद्धच्या भूमिकेविषयी काय म्हणाले?

स्टार प्रवाह या वाहिनीने सोशल मीडियावर मिलिंद गवळी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते आई कुठे काय करते या मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्ध या पात्राविषयी बोलत आहेत. ते म्हणतात, “स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका आणि त्यातील अनिरुद्ध हे पात्र ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात मीच येतो. पाच वर्षं मी अनिरुद्ध देशमुख म्हणून जगलोय. ‘स्टार प्रवाह’नं त्याला खूप मोठं केलंय. मिलिंद गवळी हा खूप वर्षांपासून मिलिंद गवळी होता. तो जो अनिरुद्ध देशमुख म्हणून एवढा प्रसिद्ध झाला, ते माझ्या आकलनापलीकडचं आहे. कारण- मी कधी विचारही केला नव्हता की, पात्र एवढं मोठं होऊ शकतं. इतकी लोकप्रियता त्याला मिळू शकते. इतक्या वर्षांत जी लोकप्रियता मला मिळाली, ती मी आनंदानं भोगली. पण, अनिरुद्ध देशमुख हे जे पात्र आहे, ते भन्नाट आहे. माझ्या करिअरमधील लक्षात राहील असं हे पात्र आहे. महत्त्वाचं म्हणजे ते नायक किंवा खलनायकही नाही, ते आपल्या आजूबाजूला दिसणारं पात्र आहे. ‘आई कुठे काय करते’मधला जो अनिरुद्ध देशमुख आहे ना तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे दिसतो; जो हसतो, रडतो, कष्ट करतो, थोड्या खोड्या करतो, आपल्या कुटुंबासाठी थोडंसं काहीतरी मिळविण्यासाठी चीटिंग करतो. तो परफेक्ट नाहीये. तो आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांपैकीच एक आहे आणि त्यामुळे तो सामान्य लोकांशी साधर्म्य साधतो.”

इन्स्टाग्राम

“खूप विचार येतात. गेली पाच वर्षं सातत्यानं अनिरुद्ध देशमुख करतोय. डेली सोप असल्यानं महिन्यातले २२ दिवस ‘अनिरुद्ध देशमुख’ जगत होतो. बऱ्याचशा वेळेला काही पात्रं साकारतो तेव्हा ती पात्रं साकारताना डिटॉक्स करायला वेळ मिळतो. इथे संधी मिळाली नाही. म्हणजे आठ-दहा दिवस शूटिंग केल्यानंतर दोन-तीन दिवसांची सुट्टी असेल, तर ते डिटॉक्स करायच्या आत परत अनिरुद्ध देशमुख असायचा. त्यामुळे तो ‘अनिरुद्ध देशमुख’ जगत गेलो. या पाच वर्षांत मिलिंद गवळीमध्येसुद्धा तो अनिरुद्ध भिनला आहे. तुम्ही जे पात्र साकारता, त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही, असं शक्य होत नाही. अनिरुद्धला सिस्टीममधून बाहेर काढणं माझ्यासाठी थोडं कठीण जाणार आहे.”

हेही वाचा: ‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण

त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “सर, तुम्ही खरंच खूप छान काम केलं आहे. मालिका चालू झाल्यासून मी आतापर्यंत सगळे एपिसोड पाहिले. आम्ही तुम्हाला खूप मिस करू”, “अनिरुद्ध देशमुख हे पात्र उत्तम होतं. कारण- मिलिंद गवळी, ते तुम्ही साकारलं आहे”, “कांचनआजीबरोबर असलेलं बॉण्डिंग खूप चांगलं होतं”, मिलिंद सर, तसेच अनिरुद्ध यांना सलाम”, असे म्हणत नेटकऱ्यांनी मिलिंद गवळी यांचे कौतुक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, येत्या काही दिवसांतच ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.