अभिनेते मिलिंद गवळी सध्या ‘मनपसंद की शादी’ या हिंदी मालिकेत काम करत आहेत. याआधी त्यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे.

मिलिंद गवळी अनेकदा त्यांच्या मनातील भावना त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करतात. आता नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर अभिनेता सुबोध भावेबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “सुबोध भावे यांच्याबरोबर मी कधीच काम केलं नाही. खरंतर दिग्दर्शिका स्वप्ना जोशी-वाघमारे बरोबर आम्ही दोघांनीही भरपूर काम केलं आहे, पण एकत्र काम कराण्याचा योग कधीच आला नाही. अशा हरहुन्नरी कलाकाराबरोबर मला काम करायला खूपच आवडलं असतं. आमची फक्त दोन-तीन वेळेला काही कार्यक्रमांमध्ये भेट झाली होती.”

“आपल्या एका मराठी कलावंतामध्ये इतकं…”

“अनेक वर्षांपासून मी सुबोध भावे यांचा या कलाक्षेत्रातला प्रवास बघत आलोय आणि अनेक वेळा मी भूमिकांविषयी बोलताना सुबोध यांचं आवर्जून नाव घेत आलोय. मराठी कलाक्षेत्रांमध्ये अनेक चांगले-चांगले कलाकार कसे टाईपकास्ट झाले आणि आयुष्यभर त्याच धाटणीतल्या भूमिका करत राहिले आहेत. पण, सुबोध भावे हे काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांनी त्यांची प्रत्येक भूमिका वेगळ्या बाजाची, वेगळ्या धाटणीची केली. आधीची भूमिका पुढच्या भूमिकेपेक्षा इतकी भिन्न आणि वेगळी असते की या कलाकाराला टाईपकास्ट करणंच कठीण आहे.”

‘बालगंधर्व’, ‘बाळ गंगाधर टिळक’, ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘फुगे’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘ पेशवाई’ मालिकेमध्ये पहिला बाजीराव पेशवा, याचबरोबर ग्रामीण भागातला ‘टुरिंग टॉकीज’ नावाचा चित्रपटसुद्धा केला.

पुढे त्यांनी लिहिले, “परवा आम्ही एकत्र कोल्हापूरला पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाला गेलो, त्यावेळेला प्रथमच आम्हा दोघांमध्ये छान गप्पा झाल्या. सुबोध यांचा आगामी ‘नीम करोली बाबा’ अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा सिनेमा, मालिका चालू आहे. दोन वेब सीरिज लवकरच ओटीटीवर येणार आहेत.”

“मला या सगळ्या गोष्टींचं खूपच कौतुक वाटतं, अभिमानही वाटतो. आपल्या एका मराठी कलावंतामध्ये इतकं टॅलेंट आहे. किती सकारात्मकता व ऊर्जा आहे, स्पष्ट विचार आहेत. कलाकार म्हणून काय करू नये किंवा कधी नाही म्हणावं. एखादी भूमिका यशस्वी झाली तरी त्याच भूमिकेत अडकू नये.”

“राजकारणात गेले तर ते खूप चांगलं…”

“सुबोध यांची अजून एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे बेधडकपणे आपलं प्रामाणिक मत कोणालाही न घाबरता व्यक्त करणं, जे मला आयुष्यात कधीही जमलं नाही. पद्मश्री जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर सगळ्याच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी होते आणि मला असं जाणवलं की, सुबोध जर राजकारणात गेले तर ते खूप चांगलं, उत्तम काम करू शकतील.”

“एअरपोर्ट शटल बसमध्ये आम्हाला नीलम गोऱ्हेताई भेटल्या. सुबोध यांनी त्यांची ओळख करून दिली. अनेक वर्ष एका थिएटरमध्ये चार मजले सामान घेऊन चढून जावं लागत होतं. काही वर्षांपूर्वी सुबोधने ही गोष्ट नीलम ताईंच्या कानावर घातली आणि ताबडतोब त्या थिएटरला लिफ्ट लावण्यात आली होती. कलाक्षेत्रातल्या समस्या सोडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हे ही मला जाणवलं”, असे म्हणत सुबोध भावे राजकारणातही उत्तम काम करू शकतात, असे वक्तव्य त्यांनी केले.

सुबोध भावे म्हणाला…

आता मिलिंद गवळींच्या पोस्टवर सुबोध भावेने कमेंट करत लिहिले, “मित्रा खूप प्रेम. तुझ्याबरोबर काम करणं हे आता माझं नवीन ध्येय आहे. तू मला अभिनेता म्हणून आवडतोस आणि माणूस म्हणून तू भारी आहेस.”

दरम्यान, सध्या सुबोध भावे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे.