लोकप्रिय मराठी अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘हम बच्चे हिंदुस्तान के’ या बालचित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘सवतीचं कुंकू’, ‘अथांग’, अशा चित्रपटांतून ते घराघरांत पोहोचले. त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्ध या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी प्रेम दिले. आता एका मुलाखतीत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या आयुष्याला वळण देणारी गोष्ट कोणती होती, याचा खुलासा केला आहे.

काय म्हणाले मिलिंद गवळी?

अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बोलताना त्यांनी म्हटले, “बारावीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो. काय व्हायचं मी कॉन्व्हेंटमध्ये होतो. मराठीचा काही अभ्यासच झाला नव्हता. मराठीचं वाचन केलं नाही. मराठीचं फार काही कळायचं नाही. तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. बरं, मला घरी कोणी रागावलं नाही. उलट माझे वडील म्हणायचे की, तुझा अभ्यास घ्यायला मलाच वेळ मिळाला नाही. तीन-चार दिवस बंदोबस्तावर ते असायचे आणि त्यांचं पोलिस ठाणं लांब असायचं. त्यामुळे घरी येऊन परत जाणं जमायचं नाही. आईला शिकवायला यायचं नाही. त्या दोघांना अपराधी वाटू लागलं की, आपणच काहीतरी चूक केली आहे आणि तिथे माझ्या लक्षात आलं की, अरे, एवढ्या चांगल्या आई-वडिलांचा मुलगा आहे आणि नाव त्यांचं काढलं नाहीस, तर नाव त्यांचं घालवू नकोस. माझ्या मनाला आणखी एक गोष्ट लागली होती. माझ्या मामांना माझ्यावर विश्वास होता की, पोरगं काय दरवर्षी पास होतं, तसं या वर्षीदेखील पास होणार. त्यामुळे पेढ्यांचा पुडा वगैरे घेऊन ते खोलीत आले आणि माझी आई कॉटवर बसून रडत होती. मला आठवतं त्यांनी तो पेढ्यांचा पुडा मागे लपवला. नंतर त्यांच्या लक्षात आलं की, हा तर नापास झालाय. बरं मी रडता रडता तेदेखील बघत होतो की, अरे, यांनी पेढ्यांचा पुडा आणला, लपवला. आईला खूपच वाईट वाटलं. त्या दिवसापासून मी ठरवलं प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आणि जे काही करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. या माऊलीला त्रास नको. या माऊलीला वाईट वाटायला नको. आपल्याला इंटरेस्ट नाही अभ्यासात. पण, त्यांना आनंद मिळतो की, अरे, याला इतके मार्क मिळाले.”

“माझ्या वर्गातले सगळे पुढे गेले आणि मागे राहिलो. म्हटलं की, दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो, तर लोकांना कळणार नाही की, हा नापास झालेला आहे. खूप वाईट वाटायचं. ऑक्टोबरला मी पास झालो. मी वडिलांना विनंती केली की, माझं कॉलेज बदला. मग कॉलेज बदललं. लाला लजपतराय कॉलेजला एक देशपांडे म्हणून सर होते. त्यांनी रायरीकर सरांना सांगितलं की, याला माझ्या गॅरटींवर अॅडमिशन द्या. तो आपल्या कॉलेजचं नाव काढेल. त्याने दोन सिनेमे केलेले आहेत. कलाकार आहे. बाकी क्रीडा विषयात मी चांगला होतोच. अभ्यास सोडून बाकीचे खूप प्रमाणपत्र होती. मला अजूनही आठवतं की, देशपांडे सरांनी माझी गॅरंटी घेतली होती की, हा पोरगा या कॉलेजचं नाव काढेल. त्यानंतर मला रायरीकरांनी लाला लजपतराय कॉलेजमध्ये प्रवेश दिला. मला आठवतं की, मी वर्गात जाताना नमस्कार केला की, या माणसाने माझी गॅरंटी घेतलेली आहे आणि तेव्हापासून माझी वाचनाची, लायब्ररीत १२-१२ तास सलग बसण्याची क्षमता वाढली. टी. वाय.मध्ये फर्स्ट क्लास होता. कधी पूर्ण विषयांत पास होत नव्हतो. टी. वाय.ला मला ६२ टक्के मार्क मिळाले. तेव्हा लक्षात आलं की, कुठेही मेहनत केली, कष्ट केले तर आपल्याला यश मिळू शकतं. हे त्या त्या काळामध्ये मला कळलं. त्यानंतर प्रोफेशनचा विचार करीत ऑल इंडिया रेडिओ जॉइन केले”, अशी आठवण मिलिंद गवळी यांनी सांगितली आहे.

हेही वाचा: लाडक्या बाबासाठी खास Surprise! रितेश देशमुखच्या वाढदिवशी दोन्ही मुलांनी केली ‘ही’ खास गोष्ट, फोटो आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मिलिंद गवळी काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला. या निमित्ताने मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमांतून ते चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते. आता या मालिकेनंतर ते कोणत्या मालिका, चित्रपट किंला वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.