Marathi Actor Work With Rahul Dravid : राहुल द्रविड… मिलेनियल जनरेशनचा आवडता खेळाडू. ९० च्या दशकात राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोन नावांची जबरदस्त क्रेझ होती. त्यामुळे तेव्हाचे अनेक तरुण या दोन खेळाडुंना भेटायची इच्छा व्यक्त करीत असणार. नशीबाने या ९० च्या दशकातीळ काही तरुणांची ही इच्छा पूर्ण झालीसुद्धा असेल. त्या नशीबवान तरूणांपैकी एक म्हणजे मराठी अभिनेता विपुल साळुंखे.
विपुल साळुंखे हा लोकप्रिय मराठी अभिनेता असून त्याने काही सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विपुल हा सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर नशीबवान असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने नुकतंच क्रिकेटर राहुल द्रविडबरोबर काम केलं असून, या अनुभवाने भारावून जात त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
द्रविडबरोबरचा फोटो शेअर करीत विपुलने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये विपुल म्हणतो, “गेल्या वर्षी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर आणि यावर्षी राहुल द्रविड… उर्फ ‘दी वॉल’. आमच्या मिलेनियल पिढीसाठी ही दोन फक्त नावं नाहीत, तर आमच्या भावना आहेत. आज मी किती आनंदी, अभिमानी आणि नशीबवान आहे हे सांगायला शब्द कमी पडतील. मला सर्वांबरोबर एक बातमी शेअर करताना खूप अभिमान वाटतोय की, मी अलीकडेच राहुल द्रविड (उर्फ ‘दी वॉल’) यांच्याबरोबर एका जाहिरातपटात काम केले आहे.”
यानंतर त्याने म्हटलं, “संपूर्ण दिवसभर, हा माणूस (राहुल द्रविड) आमच्याबरोबर एखाद्या भिंतीसारखा शांतपणे उभा होता. ना काही किरकिर, ना कशाची चिडचिड, ना कसला घमंड… त्याचं संपूर्ण लक्ष त्याच्या कामावर होतं आणि यातून त्याचे कष्टही दिसून आले. क्रिकेटच्या मैदानावर त्याचं हे व्यक्तिमत्त्व पाहायचो, पण आता शूटिंगच्या सेटवर प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.”तुम्ही मराठी ॲक्टर म्हणजे तुमचं पण थिएटर बॅकग्राऊंड असणार ना? तुम्ही पण नाटकांमध्ये काम करत असणार ना?” असं अस्खलित मराठीत प्रश्न विचारून स्वतः राहुल द्रविडनेच विषयाला हात घातला आणि मग गप्पांना सुरुवात झाली. नाहीतर मला काय बोलावं, कुठून सुरुवात करावी हे पण कळत नव्हतं. खरंतर सुधरत नव्हतं.”
विपुल साळुंखे इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर विपुल असं म्हणतो, “राहुल द्रविड आहे हा… अजूनही तो जॅमीवाला चार्म टिकवतोय… खरं सांगायचं तर, राहुल द्रविडबरोबर काम करून आलोय या अनुभवाबद्दल मी फार काही बोलू शकत नाही, जास्त काही सांगण्याऐवजी, हा क्षण माझ्यासाठी सदैव खास राहील.” दरम्यान, विपुलने शेअर केलेल्या या अनुभवावर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच राहुल द्रविडबरोबर काम करायला मिळालेल्या संधीबद्दल अनेकांची त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.