Shrirang Deshmukh & Seema Deshmukh Lovestory : श्रीरंग देशमुख व सीमा देशमुख मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. दोघे गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम करत आहेत. अशातच नुकतीच त्यांनी मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे.

श्रीरंग देशमुख व सीमा देशमुख यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. श्रीरंग सध्या ‘मुरांबा’ मालिकेतून झळकत आहेत. अशातच या दोघांनी नुकतीच ‘अनुरुप विवाह संस्थाला’ मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

या मुलाखतीत प्रेमकहाणी सांगताना श्रीरंग म्हणाले, “मी तिला पहिल्यांदा पुण्यातच एका मालिकेच्या सेटवर भेटलो. एकदा असंच पुण्याला गेलो असताना तिथून निघण्याआधी दोन-तीन दिवस आधी सगळ्या मित्रांना भेटलो आणि पाहिलं की कोणी राहिलंय का ज्याला भेटायचं आहे म्हणून डायरी पाहिली तर त्यात सीमाचा नंबर होता. मी तिला तेव्हा पहिल्यांदा फोन केला. तिचा लँडलाईन नंबर डायल केल्यानंतर म्हटलं, सीमा साठे का? ती म्हणाली, हा लाला बोल. मग आमच्यामध्ये ती ज्या नाटकात करत होती त्याबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल बोलणं झालं, पण तिने एका फोनवर माझा आवाज ओळखला हे मला चकित करणारं वाटलं.”

मुलाखतीत पुढे ते म्हणाले, “त्यानंतर मी नाटकाच्या रिहर्सलला गेलो, तिथे उपेंद्र लिमयेसुद्धा होता. त्यानंतर आम्ही तिच्या दोन चाकी गाडीने जात होतो, तेव्हा मध्येच आम्ही खायला थांबलो आणि तिथे आम्ही पावभाजी खात होतो आणि गप्पा मारत होतो. तेव्हा मी सात वर्ष मुंबईत एकटा होतो, कारण माझे वडील ससुनला हेड ऑफ द डिपार्टमेंट अॅनॉटेमीमध्ये होते. आई-बहीणही पुण्यालाच, त्यामुळे मुंबईत सात वर्ष मी माझ्या मोठ्या घरात एकटा राहत होतो. तेव्हा या सगळ्याबद्दल बोलत असताना मला सीमाने विचारलं की, अरे इतका वर्ष एकटा राहतोयस, मग लग्न का नाही करत.”

श्रीरंग यांनी सीमा यांना घातलेली लग्नाची मागणी

श्रीरंग सीमा यांच्याबद्दल पुढे म्हणाले, “ते ऐकून माझे डोळे लकाकले, कारण फोन केल्यानंतर हा लाला बोल, गाडीची चावी देणं हे सगळं होतंच; त्यामुळे मी तिला म्हटलं, गंमत काय आहे तुला सांगू का सीमा, माझ्या खूप मैत्रिणी मला विचारतात की तू लग्न का नाही करत, पण त्यांना लग्न करतेस का विचारल्यानंतर नाही म्हणतात. मग मी तिला तू करतेस का असं विचारलं, ती तारीख होती २४ डिसेंबर आणि २५ ला तिचा वाढदिवस होता, त्यामुळे मी प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणाली आता तू पण ये वाढदिवसाला. मी म्हटलं, आता म्हणजे मी विचारलंय म्हणून म्हणतेस का? तर ती म्हणाली; नाही, माझे मित्र-मैत्रिणी घरीच येतात. तेव्हा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पोहोचायला मला उशीर झाला, मी तिथे जाईपर्यंत सगळे निघून गेले होते. मग आमचं खाणं पिणं सुरू असताना तिने विचारलं की, तू काल मला विचारलंस ते खरं विचारलं की उगाचच.”

श्रीरंग याबद्दल पुढे सांगत म्हणाले, “मी तिला म्हटलं तू सांग, त्यावर तिने हो असं उत्तर दिलं. त्यानंतर आम्ही तिला काही हरकत नव्हती मला आवडणार होतं मग पुढे जाऊयात असं ठरवलं.” सीमा याबद्दल म्हणाल्या, “मी काम करायला लागले तेव्हा १९ वर्षांची होती आणि २३व्या वर्षी लग्न केलं.” लग्नाबद्दल श्रीरंग पुढे म्हणाले, “माझ्या घरी मी सांगितल्यानंतर तुझं होतंय ना, ठीक आहे, अशी प्रतिक्रिया होती; कारण काही समस्याच नव्हती. पण, आम्ही असा निर्णय घेतला होता की आपल्याला खरंच वाटतंय का की आपण एकत्र राहू शकतो, हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ घेतला.”

सीमा यांच्या आई-वडिलांबरोबर झालेल्या लग्नाच्या बोलणीबद्दल श्रीरंग म्हणाले, “आम्ही गेलो तर दादा(सीमा यांचे वडील) आणि आई म्हणाले, ठीक आहे, मग साखरपुडा करून टाकू. मी म्हटलं, आम्हाला भेटून फक्त २-३ महिने झालेत, आम्हाला साधारण १० महिने हवेत, जेणेकरून आम्हाला कळू देत की आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत की नाही. तिच्या वडिलांनी त्याला मान्यतासुद्धा दिली.” सीमा याबद्दल म्हणाल्या, “यामागचं दुसरं कारण असंही होतं की, आम्हाला दोघांनाही आमच्या लग्नाचा आर्थिक भार उचलायचा होता. लग्न ठरलं तेव्हा माझ्या सासुबाई आणि सासरे म्हणाले की लग्नाचा खर्च आपण अर्धा अर्धा करणार आहोत. त्या काळी सगळा खर्च मुलीच्या आई-वडिलांनी करायचा अशी रीत होती, पण त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी मोठी होती.”

सीमा पुढे म्हणाल्या, “मला विधीवत लग्न करण्यात फार रस नव्हता, पण सासुबाईंच्या इच्छेखातर वैदिक पद्धतीने लग्न केलं. त्यांनी सांगितलेलं की एवढी एक गोष्ट फक्त तू कर, त्यानंतर मी पुढे हे कर ते कर असं काहीच सांगणार नाही आणि त्यांनी कधीच नाही सांगितलं. माझ्या सासुबाई खूप हौशी होत्या. मी मुंबईत काम करत होते म्हणून माझ्या लग्नाची सगळी खरेदी माझ्या सासुबाई आणि नणंदेने केली. त्यांनी मी नसताना पाच सुंदर साड्या खरेदी केल्या होत्या.”

श्रीरंग पुढे म्हणाले, “आमच्या दोघांची अशी इच्छा होती की, आम्हाला फार गाजावाज नको होता लग्नात. तरीसुद्धा नाही म्हणता म्हणता ८०० लोक होते लग्नाला.” सीमा याबद्दल म्हणाल्या, “त्यांच्या घरातलं पहिलंच लग्न होतं आणि माझ्या घरातलं शेवटचं लग्न असल्याने आई-वडिलांची अशी इच्छा होती की परत कुठलं मोठं कार्य नसणार आहे बोलवूयात सगळ्यांना, असं करत ८०० लोक आले होते; तरी पुण्यात होतं म्हणून, मुंबईत असतं तर ही संख्या १५०० वगैरे असली असती.”